काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी नुकताचं शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशादरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या विधानाची आठवण करुन देत मिश्किल टिप्पणी केली. आता धंगेकर यांच्या पक्ष प्रवेशावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
धंगेकर यांच्या प्रवेशानंतर भाजपमध्ये नाराजीचा सूर पाहायल मिळत असल्याची चर्चा सुरु आहे. अनेक नेते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी धंगेकरांच्या पक्ष प्रवेशासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला आहे.
‘धंगेकरांसोबत नुसता पंगा नाही … तर..
धंगेकर आणि आमचा फक्त पंगा नाही तर आम्ही एकमेकांच्या विरोधात तीन निवडणुका लढवल्या असून त्यातली एक हरलो तर दोनदा त्यांना हरवलं आहे.
राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये एखादी गोष्ट काळाच्या ओघामध्ये बदलत असते याची मानसिक तयारी असणारे आम्ही आहोत. राज्यामध्ये महायुतीचे तीन पक्षांचं आमचं सरकार आहे. जर भाजपच्या नेत्यांनी धंगेकरांना पक्षात घेण्याच्या विचार केला असता तर मी त्यांना विरोध केला असता.
मात्र महायुतीतील प्रत्येक पक्षाला कोणाला घ्यायचं कोणाला नाही हे स्वातंत्र्य आहे. महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र असले तरी ते विलीन झालेले नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाटलं असेल की पुण्यामध्ये त्यांचं काम वाढवायचं आहे. म्हणून त्यांनी धंगेकरांना घेतलं असेल. मात्र आता ते महायुतीच्या मित्र पक्षातील सदस्य झाले आहेत.
त्यामुळे काही भाजपमधील लोक आपली भावना व्यक्त करत आहेत. मात्र तेवढं स्वतंत्र आम्ही पक्षातील लोकांना देतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जरी धंगेकरांबाबत भावना असल्या तरी ते आता आमच्या प्रमुख सहयोगी पक्षाचे नेते झाले असल्याने आमचा वाद न होऊन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. पुढील काळामध्ये आम्ही समन्वयाने पुढे जाऊ, असंही पाटील यावेळी म्हणाले.
धंगेकर यांच्या पक्षप्रवेशादरम्यान एकनाथ शिंदे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच वक्तव्याची आठवण करुन देत “आता लोकांना कळेल व्हू इज धंगेकर?” अशी मिश्किल टिप्पणी केली.
शिंदेंच्या या वक्तव्यानंतर पुण्यात शिंदे गट आणि भाजप यांच्यात नव्या वादाला सुरुवात होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.