Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeEducationजिल्ह्यात 24,292 आजी-आजोबांची रविवारी परीक्षा; दीडशे गुणांचा होणार पेपर

जिल्ह्यात 24,292 आजी-आजोबांची रविवारी परीक्षा; दीडशे गुणांचा होणार पेपर

राधानगरी – दहावी-बारावीच्या परीक्षेतून नातवंडे मोकळी होताच आता घरातील निरक्षर आजी आजोबांची परीक्षा होणार आहे. नव भारत साक्षरता कार्यक्रमातून शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या या प्रौढांची येत्या रविवारी (ता. २३) प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातून तब्बल आठ लाख प्रौढ या परीक्षेला बसणार आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात 24292 आजी-आजोबांची रविवारी परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हा शिक्षण योजना विभागातर्फे सांगितले आहे. केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागातून निरक्षरांचे सर्वेक्षण केले आहे. या योजनेला “उल्लास” असेही नाव आहे.
केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रमात गेल्या वर्षभरापासून असाक्षरांची नोंदणी आणि त्यांचा अभ्यासवर्ग सुरू आहे. आता त्यांची परीक्षा घेऊन त्यांना साक्षर झाल्याचे
प्रमाणपत्र मिळणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी १७ मार्च रोजी झालेल्या या परीक्षेतून सुमारे पाच लाख प्रौढांनी ‘साक्षर होण्याचा’ आनंद मिळविला आहे. आता राज्यात आणखी आठ लाख आजी-आजोबांना ही संधी चालून आली आहे.
राज्यात हा कार्यक्रम योजना शिक्षण संचालनालयामार्फत राबविला जात आहे. शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, असाक्षर प्रौढांनी ज्या शाळेतून नोंदणी केली, ती शाळाच त्यांचे परीक्षा केंद्र राहणार आहे.
असा असेल पेपर
■ दीडशे गुणांच्या या परीक्षेत वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या घटकांवर प्रत्येकी ५० गुणांचे प्रश्न असतील. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक घटकात ३३ टक्के म्हणजे किमान १७ गुण आजी-आजोबांना मिळवावे लागणार आहेत. तर परीक्षकांना पाच वाढीव गुण देण्याची तरतूद आहे. विशेष म्हणजे, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत प्रौढांना आपल्या सोयीनुसार कधीही शाळेत जाऊन दीड तासात पेपर सोडवता येणार आहे. दिव्यांगांना ३० मिनिटे जादा मिळणार आहेत.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News