कोल्हापूर– कसबा बावडा येथील डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ५ जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध भीती पत्रिका तयार केल्या. या भीती पत्रिकांचे भव्य प्रदर्शन महाविद्यालयाच्या NSS व ग्रंथालय विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले.
या प्रदर्शनात पर्यावरणाचे संवर्धन, वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण, जलसंवर्धन, प्लास्टिकमुक्ती, तसेच हवामान बदल यासारख्या विविध विषयांवर आधारित पोस्टर्स सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेने रंग, रचना आणि कल्पकता वापरत संदेशमूल्य असलेल्या भीती पत्रिका तयार केल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन रजिस्ट्रार डॉ. विश्वनाथ भोसले व डायरेक्टर डॉ.अजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “आजच्या पिढीने पर्यावरण रक्षणाचा विडा उचलणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबतची जागरुकता वाढते.”
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला. पर्यावरणप्रेमींच्या उपक्रमशील सहभागामुळे महाविद्यालय परिसरात सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळाली.