शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू बेमुदत अन्नत्याग करणार आहेत. मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीजवळ आज (ता. ८)पासून या आंदोलनाची सुरुवात होईल. अमरावतीमधील संत गाडगेबाबा मंदिरापासून ते तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील समाधीपर्यंत बाईक रॅली काढणार आहे. या रॅलीत 20 हजार शेतकरी सहभागी होणार आहे. आंदोलनापूर्वी बोलताना बच्चू कडू म्हणाले, ‘आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल. पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही.’
बच्चू कडू म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर मच्छीमारांसाठी आंदोलन करत आहे. यासंदर्भात शासनाकडून आश्वासन मिळाली होती. परंतु त्याची पुर्तता झाली नाही. आता जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही. शेतमालांचे भाव पडलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे. घरकुलाचा मुद्दा आहे. मच्छीमारांचा, मेंढपाळ यांचा मुद्दा आहे. अनेक वेळा पत्र देऊनही मागण्या मान्य झाल्या नाही. त्यामुळे अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली आहे.