कोल्हापूर ( प्रतिनिधी):
कोल्हापूर जिल्ह्यातील उस उत्पादक शेतक-यांचे १३५ कोटी रूपयाची थकीत एफ. आर. पी. व्याजासह शेतक-यांच्या खात्यावर १५ दिवसात जमा करावी त्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये राजरोसपणे सुरू असलेले बोगस व लिंकींग खताची विक्री करणा-या कंपन्यावर कडक कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचेकडे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन करण्यात आली.
राज्य सरकारकडून बेकायदेशीर कायदा करून साखर कारखानदार उस उत्पादक शेतक-यांना दोन किंवा तीन टप्यात एफ. आर. पी. अदा करत होते. यामुळे उस तुटल्यापासून एक -एक वर्षापर्यंत शेतक-यांना त्यांची रिकव्हरीनुसार मिळणारी हक्काची एफ. आर. पी. मिळत नव्हती.याचाच गैरफायदा घेऊन कोल्हापूर विभागातील कारखानदार जवळपास १३५ कोटी रूपायाची एफ. आर. पी. थकीत ठेवली आहे.
याबरोबरच जिल्ह्यांमध्ये युरीया व इतर खतांची टंचाई भासवून लिंकींग केले जात आहे. जिल्ह्यातील खत विक्री करणा-या किरकोळ विक्रेते दुकानदार यांचेवर कारवाई करण्याचा फार्स विभागाकडून केला जातो. बोगस खत विक्री व लिंकींग मध्ये कृषी विभागातील अधिकारी व संबधित कंपन्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने संबधित खत कंपनीवर कारवाई करण्याऐवजी स्थानिक दुकानदार यांचेवर कारवाई करून पिळवणूक केली जात आहे. यापुढे संबधित दुकानात बोगस खत व लिंकींग ची खत विक्री सापडल्यास संबधित कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानीने केली.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी येत्या आठवड्याभरात जिल्ह्यातील कारखान्यांनी थकीत एफ. आर. पी. न दिल्यास आर. आर. सी. ची कारवाई करण्यास भाग पाडू. तसेच बोगस व लिंकींग खत कंपन्याविरोधात जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिक्षक यांना सुचना देवून फिरते पथकाच्या धाडी टाकण्याचे आदेश दिले. त्याबरोबरच ज्या कंपन्या लिकींगची सक्ती करतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पोवार , धनाजी पाटील , बाळासाहेब पाटील , राजाराम देसाई , सचिन शिंदे , संपत पवार , बंडू पाटील , सुधीर मगदूम , तानाजी वठारे , विशाल चौगुले , आण्णा मगदूम , आप्पा एडके , विक्रम पाटील , विजय कर्वे , विवेक चौगुले , यांचेसह स्वाभिमानीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.