पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा ‘ग्रँड कोलार ऑफ दी ऑर्डर ऑफ दी मकारिओस थर्ड’ हा सर्वोच्च नागरी सन्मान आज सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्तोदौलिदेस यांनी प्रदान केला. सायप्रसचे पहिले राष्ट्राध्यक्ष आर्चबिशप मकारिओस थर्ड यांच्या नावाचा हा पुरस्कार विविध देशाच्या प्रमुख आणि नामवंत व्यक्तींना त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी दिला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल(दि.१५) पासून पाच दिवसांच्या सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर आहेत. सायप्रस मध्ये गेल्या 23 वर्षातील भारताच्या प्रधानमंत्र्यांची ही पहिली भेट आहे. मोदी यांनी काल लिमासोलमध्ये व्यापार विषयक परिषदेत सहभाग घेतला आणि उपस्थितांना संबोधित केलं.
140 कोटी भारतीयांच्या वतीने हा सन्मान स्वीकारताना, पंतप्रधानांनी सायप्रसचे अध्यक्ष, सरकार आणि जनतेचे मनापासून आभार मानले. त्यांनी हा पुरस्कार भारत आणि सायप्रसमधील दीर्घकालीन जिव्हाळ्याच्या संबंधांप्रती समर्पित केला, जे सामायिक मूल्यांवर आणि परस्पर विश्वासाने जोडले गेले आहेत. हा पुरस्कार भारताच्या “वसुधैव कुटुंबकम” किंवा “जग एक कुटुंब आहे” या प्राचीन तत्वज्ञानाची ओळख करून देणारा आहे जे तत्वज्ञान जागतिक शांतता आणि प्रगतीच्या दृष्टिकोनाचे मार्गदर्शक आहे असे त्यांनी पुढे नमूद केले.
भारत आणि सायप्रसमधील भागीदारी मजबूत आणि वैविध्यपूर्ण करण्याप्रति नव्याने वचनबद्धता दर्शवत पंतप्रधानांनी हा सन्मान स्वीकारला. हा पुरस्कार दोन्ही देशांच्या शांतता, सुरक्षा, सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि समृद्धी यावरील अढळ वचनबद्धतेचे प्रतीक आहे यावर त्यांनी भर दिला.