आदमापूर/प्रा.शिवाजी खतकर
उन्हाळी सुट्टीनंतर आज सोमवार शाळेचा पहिला दिवस…शाळांचे प्रांगण विद्यार्थ्यांच्या गर्दीनं फुलून गेलेलं…शाळमध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षक सकाळपासूनच लगबगीनं कामाला लागलेलं चित्र सगळीकडे पहायला मिळत होते.भुदरगड तालुक्यातील सर्वच प्राथमिक-माध्यमिक शाळांनी विविध उपक्रम राबवून आगळ्या-वेगळ्या अशा अभिनव पध्दतीने नवीन विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.दरम्यान टिक्केवाडी हायस्कूलमध्ये पारंपरिक भारतीय वेशभूषा परिधान करुन विद्यार्थी आले होते.आकर्षक विशेभूषेतील विद्यार्थ्यांची शोभायात्रा गावच्या मुख्य चौकातून शाळेपर्यंत काढण्यात आली.यावेळी नवागत विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करुन व गुलाबपुष्प,साखर-पेढे वाटून उत्फुल्ल स्वागत करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
आज पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली.शाळा सुरु होणार म्हणून गेल्या तीन-चार दिवसापासून शिक्षकांनी शाळामध्ये उपस्थित राहून पूर्व तयारी करुन घेतली होती.शाळांच्या स्वच्छतेपासून ते रंगरंगोटी करुन शाळा चकाचक केल्या आहेत. प्रत्येक शाळेत पहिली,पाचवी व आठवी वर्गांत नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश होतो.विद्यार्थ्यांना आपल्या नवीन शाळेची खूपच आपूर्वाई वाटत असते.
आज सकाळी विद्यार्थी नवीन शालेय गणवेश,नवीन दप्तर व नवीकोरी पुस्तके घेवून शाळेत दाखल झाले. अनेकांना नवीन मित्र-मैत्रीणी भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता. या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा-शाळातून जय्यत तयारी झाली होती. कांही शाळांनी या नवागत विद्यार्थ्यांना वाजत-गाजत आणले..कांही शाळांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी केली तर अनेक शाळांतून मुलांना गोड-धोड खायला देवून तोंड गोड केले.अनेक शाळांतेन सेल्फी पाँईंट द्वारे मुलांचे उत्फूर्त स्वागत केले.तर कांही शाळांतून रथ-बैलगाडी सजवून पारंपरिक पध्दतीने विद्यार्थ्यांची चक्क गावातून शोभायात्रा काढली.त्याला ढोल-ताशा या पारंपरिक वाद्यांबरोबरच विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने साथ दिली.यावेळी गावचे सरपंच,ग्रा.पं.सदस्य,सहकारी संस्थांचे पदाधिकारी, पोलीस पाटील,शाळा कमिटी सदस्य व गावातील मान्यवर मंडळी यामध्ये सहभागी झाल्याचे चित्र पहायला मिळत होते.अशा पध्दतीने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.