Wednesday, July 9, 2025
Google search engine
HomePOLITICAL‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’, परिवहन महामंडळ राबविणार विशेष मोहिम..

‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’, परिवहन महामंडळ राबविणार विशेष मोहिम..

मुंबई : शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनीसाठी ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही मोहिम राबविण्यात येणार असून आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा- महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जूनपासून सुरू होत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६ टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनकडून पास घेतले जात असत.

या योजनेमुळे विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळावे लागणार नाही. त्यांच्या शाळा – महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून संबंधितांना त्यांचे पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. यामुळे त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम १६ जूनपासून राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन पासची आवश्यकता असणाऱ्या शाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार असल्याचेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News