कोल्हापूर ( प्रतिनिधी ):
जून महिन्यात होत असलेल्या संततधारा पावासाने धरणक्षेत्राबरोबर शेतजमीनीतही पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यामुळे यापुढे पडणा-या पावसाचे पाणी थेट नदीमध्ये प्रवाहित होत राहणार आहे. जुलै , ॲागस्ट व सप्टेंबर महिन्यातील हवामान खात्याकडून पावसाच्या अंदाजाची माहिती घेऊन १५ ॲागस्ट पर्यंत अलमट्टी धरणातील पाणीसाठा ५१५ मीटरपर्यंत स्थिर ठेवण्याबाबत कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडे केली.
जागतिक बॅंकेने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी मंजूर झालेल्या निधीतून पायाभूत कामे प्राधान्याने करण्यात यावीत त्याबरोबरच यंदाच्या वर्षी येणा-या महापूराच्या नियंत्रण व उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी राजू शेट्टी यांनी अलमट्टी धरणातील पाणीसाठा वाढत गेल्यास हिप्परगी धरणातील बॅकवॅाटर नृसिंहवाडीपर्यंत येत असल्याने ऐन पावसाळयात झालेल्या मुसळधार पावसामुळे सहयाद्री घाटमाथ्यावरून वेगाने येणा-या पाण्याच्या प्रवाहास अडथळे निर्माण होवून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा प्रश्न गंभीर होणार आहे. यामुळे प्रशासनाकडून कर्नाटक सरकारशी संवाद साधून १५ ॲागस्ट पर्यंत अलमट्टी धरणाची पाणीपातळी ५१५ मीटर पर्यंत स्थिर ठेवण्याबाबत मागणी केली.
मुळात जागतिक बॅंकेकडून महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधी मिळतो. या निधीतून शहरातील गटर्स कामे केल्यास उर्वरीत कामास निधीची कमतरता पडण्याची शक्यता आहे. जर नदीतून पाणी प्रवाहित होत नसेल तर शहरातील पावसाचे पाणी नदीतून प्रवाहीत होण्यास अडथळे निर्माण होणार आहेत. सध्या पुराची पाणीपातळी व शहरातील गटर्सची पाणीपातळी याचा विचार केल्यास नदीचे पाणी शहरात मोठ्या प्रमाणात येते. यामुळे शहरातील गटर्सचे काम होवूनही पूराचा प्रश्न जैसे थे राहणार आहे.
याकरिता राज्य सरकारने जागतिक बॅंकेच्या सहकार्याने होत असलेले पूर नियंत्रणासाठीचा संपुर्ण सर्व्हेक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरवात करावी. या निधीमधून प्राधान्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कर्नाटक सीमाभागातील कृष्णा , पंचगंगा व वारणा नद्यांच्या पूर नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांवर पहिल्यांदा निधी खर्च करण्याची मागणी करण्यात आली.