कोल्हापूर :- लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती वर्षाचे औचित्य साधत प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी साकारलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या संक्षिप्त चरित्राचे प्रकाशन गुरूवार दि. २६ जून रोजी लक्ष्मी-विलास पॅलेस येथे माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत होणार असल्याचे प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या लोकोत्तर जीवनकार्यावर आजपर्यंत बरेच लेखन झाले आहे. तरीसुद्धा राजर्षी शाहूंच्या अलौकिक, क्रांतिकारक, महान कार्याचे अनेक पैलू दुर्लक्षित आहेत. राजर्षी शाहूंच्या लोकोत्तर जीवनकार्याचा जागर करण्यासाठी राजर्षी शाहू कार्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्र शासनाचा सी. डी. देशमुख उत्कृष्ट वाड़्•मय पुरस्कारप्राप्त लेखक, अर्थायनकार प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी ” *”राजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्र” हे २१२ पृष्ठांचे पुस्तक साकारले आहे.
जागतिकीकरणाचे पुरस्कर्ते, राजर्षी शाहूंची पेटंटनीती, प्रशासन धुरंधर, राजर्षी शाहूंचे बालविवाह प्रतिबंधक धोरण, अनाथ बालकांचे संगोपनकर्ते, कुशल अर्थसारथी, शेतकऱ्यांचे हितरक्षक, उद्योग उभारणीचे द्रष्टे, सहकार चळवळीचे प्रवर्तक, सामाजिक क्रांतीचे प्रणेते, राजर्षी शाहूंचे प्रवित्र श्रद्धास्थान, अशा एकूण ३७ प्रकरणांचा समावेश या संक्षिप्त चरित्रामध्ये आहे. विशेष बाब म्हणजे प्रत्येक प्रकरण वाचल्यानंतर पुनरावलोकनासाठी प्रश्नावली उपलब्ध आहे. अशा प्रश्नांची एकूण संख्या २८८ आहे.
तरी सर्व शाहूप्रेमींनी जन्मस्थळी शासकीय कार्यक्रमानंतर पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन लेखक प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी केले आहे.