श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ला मोठं यश मिळालं आहे. या हल्ल्याप्रकरणी एनआयएने रविवारी दोन जणांना अटक केली असून, त्यांनी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आणि मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेले दोघेही काश्मीरमधील रहिवासी असून, त्यांची ओळख परवेझ अहमद जोथर (बटकोट, पहलगाम) आणि बशीर अहमद जोथर (हिल पार्क, पहलगाम) अशी पटली आहे. एनआयएच्या तपासानुसार, या दोघांनी हिल पार्क परिसरातील झोपडीमध्ये लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना जाणीवपूर्वक आश्रय दिला होता. त्यांनी या दहशतवाद्यांना जेवण, आश्रय व इतर आवश्यक गोष्टी पुरवल्या होत्या. याशिवाय, सुरक्षा यंत्रणांची दिशाभूल करत त्यांच्या ओळखी लपवल्या होत्या.
भीषण हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला होता. हल्लेखोरांनी पर्यटकांची धार्मिक ओळख पटवून त्यांची निर्दय हत्या केली होती. या घटनेनंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार कारवाई केली होती. मात्र, या हल्ल्यात थेट सहभागी असलेले चार दहशतवादी अद्यापही सुरक्षा दलांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे हा तपास सुरक्षायंत्रणांसमोर मोठं आव्हान ठरतो आहे.
कायदेशीर कारवाई सुरू
एनआयएने अटकेतील दोघांविरोधात बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा, १९६७ (UAPA) च्या कलम १९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सध्या अधिक तपास सुरू असून, लवकरच आणखी अटक होण्याची शक्यता एनआयएने व्यक्त केली आहे.