उजणी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने उजनी धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपुरात चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाळवंटातील भक्त पुंडलिकासह अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
पुणे आणि सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणातून ४१ हजार ६०० तर वीर धरणातून १५ हजार क्युसेक विसर्गाने पाणी सध्या भीमा नदीकडे येत आहे. नीरा आणि भीमा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तसेच धरणातील विसर्गामुळे चंद्रभागेचे वाळवंट आणि मंदिरे पाण्याखाली गेली आहेत . अजूनही पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने सध्या चंद्रभागेत स्नानाला येणाऱ्या भाविकांनी काठावर उभारून केवळ पाय धुण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आषाढी एकादशीच्या तोंडावर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पाऊस सुरु झाल्यास चंद्रभागेला पुर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.