महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला गळती लागल्याचे चित्र आहे. अशातच, भाजपने मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती केली. त्यामुळं घोसाळकर या भाजपमध्ये जाणार या चर्चेने राज्यात उधाण आले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. तेजस्वी घोसाळकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेत दहिसर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता.
काही दिवसांपूर्वी, भाजप नेते आणि मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांची बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती केली आहे. या नियुक्तीने तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरदार रंगली. मात्र, आपण ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहणार असल्याचा त्यांनी स्पष्ट केलं आणि दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
त्याचबरोबर नाराजी संपल्याचंही जाहीर केलं. मी पक्षात नाराज होते, पण उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर त्यांनी माझी नाराजी दूर केली. त्यामुळे मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. ते माझे कुटुंबप्रमुख आहेत, असे तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं आहे. मी दुसऱ्या कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार केलेले नाही, असं काहीही झालेलं नाही. या सगळ्याला वेगळे वळण दिले जात आहे, असेही तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले होते.