कसबा बावडा :
राजर्षी शाहू विद्यामंदिर, शाळा क्र. ११, मनपा येथे अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून दिनांक ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहातील दुसरे पुष्प दिनांक ४ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून साजरे करण्यात आले.
या दिवशी “ग्रंथालय रचना” आणि “सलग ११ मिनिटे वाचन” हे उपक्रम पार पडले. यामध्ये विद्यार्थ्यांनी शालेय ग्रंथालयाची रचना, पुस्तकांची मांडणी, ठेवणी, विभागवार आणि विषयानुसार वर्गीकरण याचे प्रात्यक्षिक अनुभवले. विशेषतः फिरत्या वाचनालयातील पुस्तकांचे वर्गीकरण विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष करून दाखवले आणि नंतर सर्वांनी सलग ११ मिनिटे वाचन केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रप्रमुख डॉ. अजितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “एकविसाव्या शतकात भारत जगाचे नेतृत्व करणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच शिक्षक आणि पालकांकडून मिळणाऱ्या संस्कारांचा स्वीकार करणे अत्यंत गरजेचे आहे. पुस्तके ज्ञान देतात, पण शिक्षक आणि पालक हे चालते-बोलते विद्यापीठ आहेत. त्यांचा आदर केल्यास तुम्ही आगामी आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊ शकता.”
त्यांनी पुढे सांगितले की, “शिक्षणाने संस्कार निर्माण होतात आणि संस्कारांनीच आदर्श नागरिक घडतात. अशा नागरिकांमुळे भारत महासत्ता होणार हे निश्चित आहे.”
या प्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून भारतवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश पिसाळ, अनिकेत चौगले, मनोज पाटील, सचिन चौगले, स्वप्नील चौगले, सद्दाम मुजावर, संभाजी नलवडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रशिक्षक श्री. आर. जी. कीर्तिकर यांनी मराठी भाषेच्या उगमापासून ते आधुनिक मराठी भाषेपर्यंतच्या प्रवासावर सविस्तर भाष्य केले. त्यांनी संत ज्ञानेश्वरांपासून आधुनिक लेखकांपर्यंत मराठी भाषेतील योगदान अधोरेखित केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये तमेजा मुजावर, विद्या पाटील, दिपाली यादव, उपमुख्याध्यापक उत्तम कुंभार, बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील, सावित्री काळे, पायल पाटील, आराध्या काळे, शीतल पाटील, सुप्रिया माने, विशाल चव्हाण आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.