कोल्हापूरातील दसरा चौक ते ताराराणी पुतळा जाणारे रोडवरील व्हिनस चौक, कोल्हापूर येथील हॉटेल व्हिनस लॉजिंग येथे वेश्या व्यवसाय सुरू आहे. अशी खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे छापा कारवाई करणे करीता पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षा कडील अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी व्हिनस हॉटेल व लॉजिंग येथे बोगस गिराईक पाठवून खात्री करून घेतली. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. महिला पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी या ठिकाणी दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी छापा कारवाई केली. त्यामध्ये वेश्या व्यवसाय चालविणारा व हॉटेल व्हिनस लॉजिंगचा मालक चालक इसम जयसिंग मधूकर खोत व.व. २६, रा. कुंभारवाडी, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर यास ताब्यात घेतले व तो वेश्या व्यवसाया करीता वापरत असलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील एक परप्रांतीय महिला व रायगड जिल्ह्यातील एक अशा एकुण ०२ पिडीत महिलांची सुटका केली. सदर छापा कारवाई मध्ये ९ हजार २५०/- रोख रक्कम, मोबाईल हँडसेट एक व निरोध पाकीटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाई मधील आरोपी नामे जयसिंग मधूकर खोत याची चौकशी केली असता त्यामध्ये त्याने गरजु महिलांच्या संपर्कात राहुन त्यांना असे बेकायदेशीर कृत्य करून ग्राहकाकडून ३,०००/-रूपये घेवून त्यापैकी १,५००/-रूपये आपणांस व १,५००/- रूपये पिडीत महीलेस तसेच लॉजिंगमधील खोलीचे भाडे पोटी ५००/-रूपये घेत असल्याचे सांगितले.
त्याच प्रमाणे छापा कारवाई मधील पिडीत महिला यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी आपली अर्थिक परिस्थीती बेताची असुन गरजेपोटी आपण आरोपी जयसिंग खोत याने सांगितलेल्या वेळी हॉटेल व्हिनस लॉजिंगमध्ये येवून ग्राहकांसोबत शरिरगमन करीत असल्याचे तसेच शरीरगमनाचे प्रत्येक ग्राहकाकडून पैसे घेऊन जयसिंग खोत यास देत असल्याचे सांगितले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक साो, योगेशकुमार, अपर पोलीस अधीक्षक , डॉ. बी. धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहा पोलीस निरीक्षक स्वाती यादव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, राजेंद्र घारगे व हिंदुराव चरापले, पोलीस अंमलदार सायली कुलकर्णी, विलास किरोळकर, अश्विन डुणूंग, उत्तम सडोलीकर, राकेश माने, तृप्ती सोरटे, प्रज्ञा पाटील व अमित मर्दाने यांनी केली आहे.