मुदाळतिट्टा/प्रा.शिवाजी खतकर
भुदरगड तालुक्यातील मुदाळ या छोट्याशा पण स्नेहबंधांनी समृद्ध गावाने एक अनोखा इतिहास रचला आहे. तब्बल १७५ वर्षांनंतर एका खुतातील सर्व भावकी — २२२ सदस्य — पुन्हा एकत्र आली, आणि मायेचा ओलावा पुन्हा फुलवू या भावनेतून एक अविस्मरणीय स्नेहमेळावा साजरा केला.
काळाच्या ओघात संपत्ती, मान–अपमान, राजकारण आणि गैरसमज यांच्या वादळात अनेक कुटुंबे दुभंगली. भावा-भावांमधील संवाद तुटला, मनात रुसवे-फुगवे घर करून बसले. मात्र, आता पुरे, भूतकाळ विसरून एकत्र येऊ या — या उदात्त विचाराने स्वर्गीय धोंडी सखाराम उर्फ रावजी पाटील यांच्या वंशजांनी इतिहास घडवला.
या भावकीत देवबा, शिवबा, अंबाजी आणि संभाजी यांच्या पिढ्यांतील वंशजांचा समावेश होता.
कार्यक्रमात सर्वांनी मनमोकळं हितगुज केलं, जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि अबोलपणाचा अंत करून, झाले गेले गंगेला मिळाले म्हणत भावबंध अधिक दृढ केले.
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र बसून भोजन घेतलं, हसले, बोलले, आणि एकमेकांना आलिंगन देत एकतेचा नवा धडा शिकवला. काहींच्या डोळ्यांत पाणी तर काहींच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी होती.
आजच्या धावत्या जगात प्रत्येकजण स्वतःपुरता मर्यादित झाला आहे. मात्र मुदाळ येथील या पाटील कुटुंबाने दाखवून दिलं की नाती जपण्यासाठी वेळ नाही, तर मन हवं!
या स्नेहमेळाव्याने समाजासमोर एक अद्वितीय आदर्श ठेवला आहे — वर्षातून एकदा का होईना, पण एकत्र या… आनंद वाटा, मने जोडूया!या विचाराने भावकीतील शहाजी पाटील, गंगाराम पाटील,किरण पाटील आदी सारख्या इतर तरुण वर्गाने पुढाकार घेतला.
आटपाडी येवून १६८६ साली मुदाळ( ता. भुदरगड) येथे स्थलांतरित झालेल्या धोडी रावजी पाटील यांच्या घराण्याची आज अनेक कुटुंबे निर्माण झाली आहेत. काळानुसार विभाजित झालेली प्रत्येक कुटूंब सवतासुभा मांडून जगत असताना तब्बल ३३९ वर्षानंतर या पाटील भावकीला मूळ कुळाची जाणीव झाली. विचारविनिमयातून सारे जण एक झाले. अनेक वर्षात झालेले हेवेदावे, बाजूला ठेवून माविकीने स्नेहमेळावा आयोजित केला. एकाच रक्ताचे आपण वारसदार आहोत, ही भावना जागृत करून अबालवृद्ध मोकळ्या मनाने स्नेहमेळाव्यात सहभागी झाले. भावकीतील वादावर पडदा पाडून एकत्र येण्याचा केलेला आदर्श सर्व समाजासाठी नवी दिशा देणारा ठरला आहे.
नाती दुरावत चालली असताना पूर्वकुळाचा स्नेहमेळावा होत असल्याने पाटील भावकीतील सर्व सदस्यांना अभूतपूर्व आनंद झाला. त्यामुळे मेळाव्यास २२२ सदस्य उपस्थित राहिले. अनोख्या मेळाव्यात भावकीतील सारे जण एकत्र आल्याने सर्व जण हरखून गेले. यावेळी ज्येष्ठांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
खरोखरच मुदाळ गावातील या ३३९ वर्षांच्या भावकीचा स्नेहमेळावा — एकतेचा, प्रेमाचा आणि मानवी नात्यांच्या पुनर्जन्माचा सोहळा ठरला!