मुंबई:
राज्यात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप, शिंदे गटातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांची महायुती सज्ज झाली आहे. या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाणार असल्याचे संकेत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाला असून तिन्ही पक्ष एकत्र रिंगणात उतरतील. दुसरीकडे, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ठाणे महापालिकेसंदर्भात मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून, तेथे एकत्र लढण्याची शक्यता तपासली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, “जिथे विरोधकांना फायदा होईल, तिथे आम्ही एकत्र लढणार. उर्वरित ठिकाणी पक्ष स्वतंत्रपणे लढून नंतर एकत्र येतील.”
यंदाच्या निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष बहुतेक ठिकाणी वेगवेगळे लढण्याची शक्यता असून, निकालानंतर पुन्हा एकत्र येण्याची रणनीती आखण्यात आली आहे. मतविभाजन टाळून महाविकास आघाडीला रोखण्यासाठी मुंबईत मात्र महायुतीने एकजूट दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून अजून कोणताही अधिकृत फॉर्म्युला जाहीर झालेला नाही. मात्र शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेमध्ये युतीच्या चर्चेला वेग आला आहे, त्यामुळे राज ठाकरे यांचा पुढील राजकीय निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.




