नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून, या अपघाताला भारतीय वंशाचा २१ वर्षीय युवक जसनप्रीत सिंग जबाबदार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जसनप्रीत अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहत होता, तसेच अपघाताच्या वेळी दारू आणि ड्रग्जच्या नशेत ट्रक चालवत होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी अपघातानंतर जसनप्रीतला तात्काळ अटक केली आहे.
अपघाताची घटना कशी घडली?
सॅन बर्नार्डिनो काउंटी फ्रीवेवर जसनप्रीत सिंगने चालवलेला सेमी-ट्रक हळूगतीने जाणाऱ्या वाहनांना जोरदार धडकला. ट्रकच्या डॅशकॅम फुटेजमध्ये तो एका एसयूव्हीला धडकताना स्पष्टपणे दिसत आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
तपासात असे समोर आले आहे की जसनप्रीतने ब्रेक न दाबता ट्रक चालवत ठेवला होता. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी सांगितले की तो दारू आणि अमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवत होता. अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, तो पूर्णतः मद्यधुंद अवस्थेत असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. ही माहिती कॅलिफोर्निया हायवे पेट्रोलचे अधिकारी रॉड्रिगो जिमेनेझ यांनी दिली.
बेकायदेशीररित्या अमेरिकेत प्रवेश
अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागाने (DHS) पुष्टी केली आहे की जसनप्रीत सिंगकडे वैध स्थलांतर दर्जा (Valid Immigration Status) नाही. तो २०२२ साली दक्षिणेकडील सीमा ओलांडून अमेरिकेत प्रवेश केल्याचे समजते. त्या वेळी “अटकेच्या पर्याय (Alternative to Detention)” धोरणाअंतर्गत त्याला देशात राहण्याची परवानगी देण्यात आली होती.
सध्या यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ने त्याच्याविरुद्ध इमिग्रेशन डिटेनर जारी केला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.