दोनवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील खुपिरे येथील विठ्ठल पाणीपुरठा नंबर २ चा ट्रान्सफॉर्मर काही अज्ञातांनी फोडून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. सद्यस्थितीत विद्युतपंप बंद आहेत. या घटनेमुळे गावातील व परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
भोगावती नदीवर विठ्ठल पाणीपुरठा नंबर २ चा ट्रान्सफॉर्मर आहे. पावसाळा संपत आला आहे. संस्थेने आगामी पुढच्या वर्षाची तयारी केली होती. पुढील हंगामात कोणत्याही शेतकऱ्याला पाण्याची अडचण येऊ नये यासाठी सातत्याने सर्व संचालक वर्ग प्रयत्नशील होते. चोरट्यांनी अचानक ट्रान्सफॉर्मरच फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरीला नेल्या आहेत . सोमवारी रात्रीच्या वेळेस ही घटना घडली आहे. सद्यस्थितीत कोणताही विद्युतपंप सुरू नाही.परंतु पावसाळा संपल्यावर विद्युतपंप सुरु करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न सुरू केले होते. ऐन नोव्हेंबर महिन्यातही पाऊस सुरू असल्याने जॅकवेलच्या ठिकाणी कोणीही नव्हते. याचा अंदाज घेऊन अज्ञातांनी हे कृत्य केले आहे.
काही दिवसांपूर्वी दोनवडे तालुका करवीर येथील पाणीपुरवठा संस्थेचा ट्रान्सफॉर्मर अशाच पद्धतीने फोडून नेला होता. त्या पाठोपाठ खुपिरेत देखील अशी घटना घडल्याने शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर फोडणारे व केबल चोरी करणाऱ्या चोरट्यांचा छडा लावावा. या सर्वांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी व नागरिकांतून व्यक्त होत आहे.