मुदाळतिटृटा/प्रतिनिधी :
बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये भ्रष्टाचार, अनागोंदी कारभाराच्या तक्रारी झाल्या. ट्रस्ट बरखास्त करून दोन वर्षे चौकशी झाली. नंतर दोष न आढळल्याने धर्मादाय आयुक्तांनी देवस्थानच्या हाती पुन्हा कारभार दिला. ट्रस्ट-मधील काही मंडळींनी पुन्हा चुकीचा कारभार सुरू केला म्हणून आम्ही तक्रार केली. त्यांच्यावर कारवाई होईल, पण त्यासाठी ट्रस्टच बरखास्त करा, अशी मागणी करणे चुकीचे आहे, असे मत मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले व पदाधिकारी यांनी व्यक्त केले. उद्या, रविवारी काही मंडळी मोर्चा काढणार आहेत, या पार्श्वभूमीवर भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, देवस्थान मंडळ बरखास्त करून चौकशी केली. प्रशासक म्हणून शिवराज नाईकवडी व त्यानंतर रागिनी खडसे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाचा कारभार देत झालेल्या व्यवहारांची चौकशी झाली. त्यात कोणतेही तथ्य आढळले नसल्याने धर्मादाय आयुक्तांनी पुन्हा देवस्थानच्या हाती कारभार दिला. हा निकाल उच्च न्यायालयाने कायम केल्याने यापूर्वीच्या आरोपात तथ्य नाही असे म्हटल्याचे त्यांनी सांगितले.
अलीकडे ट्रस्टमधीलच काही पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कारभार सुरू केला म्हणून मी व काही पदाधिकाऱ्यांनी लेखी तक्रारी दिल्या. अपहरण करून प्रोसिडिंग लिहून घेतले आणि पानेही फाडली आहेत, अशी तक्रार लेखनिक स्मार्त यांनी पोलिस ठाण्यात दिल्यावर कार्याध्यक्ष लक्ष्मण होगडे व पदसिद्ध सदस्य सरपंच विजय गुरव यांना अटक झाली. त्यामुळे मोर्चा काढून ट्रस्ट बरखास्त करा, अशी मागणी करणे चुकीचे आहे. बाळूमामाच्या दर्शनाला रविवारी गर्दी होते. अशा वेळी मोर्चा काढणे योग्य नाही.
भावना व्यक्त करण्याचा अधिकार आपल्याला आहे. मात्र, प्रशासन पातळीवर जाब विचारावा, त्याला उत्तर देण्यास बांधील आहोत, असेही धैर्यशील भोसले यांनी सांगितले.
यावेळी दत्तात्रय पाटील, दिनकर कांबळे, यशवंत पाटील, संभाजी पाटील, दिलीप पाटील, संदीप मगदूम, विनायक शिंदे, इंद्रजित निंबाळकर उपस्थित होते.