राधानगरी, दि. ८ नोव्हेंबर – कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी वाहनचोरांच्या टोळीवर मोठा घाव घातला आहे. राधानगरी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल १३ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत सुमारे २ लाख ५० हजार इतकी आहे.
राधानगरी पोलीस ठाणे हद्दीतील युवराज उर्फ विनायक साताप्पा कांबळे (वय ३६, रा. नरतवडे, ता. राधानगरी) या इसमाकडे चोरीच्या मोटारसायकली असल्याची गुप्त माहिती ट्रॅफिक पोलीस अंमलदार रणधीर बरोडे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्याकडे दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले.
या पथकाने कसून चौकशी करून आरोपी विनायक कांबळे याच्याकडून विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १३ मोटारसायकली हस्तगत केल्या. प्राथमिक तपासात उघड झाले की, या मोटारसायकली कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीतील ४ व शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील ४ अशा एकूण ८ प्रकरणांमध्ये नोंद असलेल्या चोरीच्या गाड्या आहेत. उर्वरित ५ गाड्यांच्या नोंदणीविषयीची माहिती अपूर्ण असून, त्यांच्या मूळ मालकांचा शोध सुरू आहे.
राधानगरी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांच्या मोटारसायकली चोरीस गेल्या आहेत, त्यांनी आपल्या वाहनांचे चेसिस आणि इंजिन नंबर तपासून राधानगरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार , अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार सों आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.