कोल्हापूर, दि. ८ नोव्हेंबर – जिल्ह्यातील अवैध व्यवसाय आणि अंमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मोठी कारवाई करत दोन इसमांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून MEPHEDRONE (MD) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व अंमलदारांच्या टीमला बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, उचगाव (ता. करवीर) येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०४ लगतच्या सर्व्हिस रोडवर एक इसम मोटारसायकलवरून MEPHEDRONE विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि तपासदरम्यान दोन इसमांना रंगेहात पकडले.
अटक करण्यात आलेल्यांची नावे —
१) अभिषेक कुशाजी मोरे (वय २३, रा. जाधववाडी, घोडके गल्ली, कोल्हापूर)
२) विवेक तानाजी पोवार (वय २८, रा. संकपाळ कॉम्प्लेक्स, सी-१, उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर).
या दोघांकडून पोलिसांनी १२.२३ ग्रॅम MEPHEDRONE (MD) अंमली पदार्थ, तीन मोबाईल हँडसेट व जिक्सर मोटारसायकल (क्र. MH-03-BX-6739) असा एकूण ₹२,३६,१५०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तपासादरम्यान आरोपी विवेक पोवार याने सदर अंमली पदार्थ नेरूळ, मुंबई येथून आणल्याचे कबूल केले आहे. दोन्ही आरोपींना आणि जप्त मुद्देमालासह गांधीनगर पोलीस ठाणे येथे हस्तांतरित करण्यात आले असून, पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाणे करत आहे.
ही कारवाई उपनिरीक्षक शेष मोरे आणि अंमलदार योगेश गोसावी, वैभव पाटील, गजानन गुरव, शिवानंद मठपती, संतोष बरगे, समीर कांबळे, विशाल खराडे, राजू कोरे, परशुराम गुजरे, अमित मर्दाने व प्रदीप पाटील यांनी संयुक्तपणे केली.