बारामती, पुणे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरू झाला आहे. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा पुत्र पार्थ पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली असली, तरी अजित पवार यांनी रविवारी बारामतीत स्पष्ट केले की, “आरोप हे निवडणुकीचा अविभाज्य भाग बनले आहेत; पण सत्य लवकरच समोर येईल.”
मुंढवा आणि बोपोडी येथील शासकीय जमिनींच्या कथित खरेदी-विक्री प्रकरणात पार्थ पवार यांच्या कंपनीने १८०० कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या प्रकरणात काही जणांवर गुन्हा दाखल झाला असला तरी पार्थ पवार यांचे नाव गुन्ह्यात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीदेखील विरोधकांनी अजित पवार यांना लक्ष्य करत त्यांचा राजीनामा मागितला आहे.
अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, “मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात प्रामाणिक अधिकारी चौकशीसाठी नेमले आहेत. महिनाभरात वस्तुस्थिती स्पष्ट होईल. निवडणुका सुरू झाल्या की आमच्यावर आरोपांचा वर्षाव होतो. २००८-०९ मध्ये माझ्यावर ७० हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप झाला होता, पण आजवर त्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. मात्र आमची बदनामी मात्र झाली.”
आपल्या कारकिर्दीत नियमांनुसारच काम केले असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी प्रशासनालाही संदेश दिला — “माझ्या नावाचा वापर करून कुणीही नियमबाह्य काम करू नये. ते माझे नातेवाईक असोत वा कार्यकर्ते. कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियमात न बसणारे काम करू नये.”
मुंढवा प्रकरणातील कागदपत्रांबाबत आश्चर्य व्यक्त करत अजित पवार म्हणाले, “१ रुपयाचा व्यवहार न करता कोट्यवधींचे आकडे लिहून कसा कागद तयार होऊ शकतो? हे प्रशासकीय प्रक्रियेत गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहे. नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याने अशी चूक का केली, हे तपासातून स्पष्ट होईल.”
प्रशासनावरील विश्वास आणि पारदर्शकतेचा पुनरुच्चार करत अजित पवार यांनी निष्कर्ष काढला — “आरोप कितीही झाले, सत्य लपवता येत नाही. एका महिन्यात सर्व काही स्पष्ट होईल.”