मुदाळतिट्टा/प्रा.शिवाजी खतकर:
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच इच्छुकांची धडपड जोर धरू लागली आहे. मनासारखे आरक्षण जुळताच ‘गेम चेंजर’ ठरू शकणाऱ्या महिलांना खुश करण्यासाठी विविध इच्छुकांनी थेट देवदर्शन यात्रांचा घाट घातला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आदमापूर (ता.भुदरगड) येथील संत बाळूमामांच्या दर्शनाला राज्यभरातून महिलांच्या ‘स्पेशल’बस सतत दाखल होत असून परिसर अक्षरशः भाविकांनी फुलून गेला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांतून खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसने महिला भाविकांच्या गर्दीचा लोंढा दररोज आदमापूरकडे वळत आहे. शाळकरी मुलांच्या सहलीही आता बाळूमामादर्शनासाठी मार्गस्थ होत असून आदमापूर—मुदाळतिट्टा हे संपूर्ण क्षेत्र यात्रामय वातावरणात नटले आहे.
नुकत्याच घोषित झालेल्या निवडणुका आणि अचारसंहितेची टांगती तलवार लक्षात घेता उमेदवारांना लाखो रुपये खर्चून थेट प्रचार करता येत नाही. त्यामुळे महिलांना देवदर्शन घडवून ‘लोकसंपर्कात’ गुण मिळवण्याचा नवा ट्रेंड आकार घेत आहे. पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूरसह विविध देवस्थानांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुकांनीदेखील विशेष दर्शन-बसेस सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
यामुळे उमेदवारांची स्पर्धा आता केवळ मतदारांपुरती न राहता, ‘दर्शन सोहळ्यां’च्या खर्चावरून कोण भारी? अशा चर्चांनी सोशल मीडिया आणि गावकुस गाजवला आहे. साधारण उमेदवार धनदांडग्या इच्छुकांसमोर टिकणार की नाही? यावर मोठ्या आवाजात चर्चा सुरू आहे.
एका मतदारसंघात तर तब्बल अनेक इच्छुकांनी एकाच दिवशी महिलांना वेगवेगळ्या बसमधून बाळूमामाचे दर्शन घडवले. त्यामुळे—
बाळूमामा नक्की कुणावर प्रसन्न होणार?
दर्शनवारीचा अंतिम लाभ कुणाच्या खात्यात जाणार?
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.