कोल्हापूर – छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च (सायबर महाविद्यालय) येथे कै. डॉ. ए. डी. शिंदे स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ‘भारतीय अर्थव्यवस्थेचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष **डॉ. एस. महेंद्र देव** यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भारत आगामी काळात परिवर्तनाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचेल, असा ठाम आशावाद त्यांनी व्यक्त केला.
डॉ. देव यांनी 1991 नंतरच्या आर्थिक सुधारणांचा आढावा घेत सध्याच्या जागतिक आणि देशांतर्गत आव्हानांवर विस्तृत चर्चा केली. 2047 पर्यंत विकसित भारत* घडवण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी परदेशी गुंतवणूक, खाजगी गुंतवणूक आणि निर्यात वाढणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले.
जागतिक पातळीवरील राजनैतिक तणाव, युद्धस्थिती, वाढते कर्ज, हवामान बदल आणि संभाव्य मंदी यांसारख्या संकटांचा सामना करताना भारताने उत्पादनक्षमता आणि टिकाऊ शेतीकडे लक्ष द्यावे, असा त्यांनी सल्ला दिला. तांदूळ, गहू, ऊस या पिकांमध्ये होत असलेला अतिरिक्त पाण्याचा वापर आणि त्यासाठी आवश्यक असलेले पीक पद्धतीतील भौगोलिक बदलही त्यांनी अधोरेखित केले.
देशातील वाढती आर्थिक असमानता दूर करण्यासाठी गुणवत्तापूर्ण रोजगार, उत्कृष्ट शिक्षण, आरोग्य आणि कौशल्यविकास या क्षेत्रात दीर्घकालीन उपाययोजनांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जनधन योजना, स्वच्छ भारत, पंतप्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर यांसारख्या सरकारी उपक्रमांना अधिक प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता त्यांनी मांडली. तसेच पंतप्रधानांची ‘Lifestyle for Environment’ ही संकल्पना भविष्यात सकारात्मक बदल घडवेल, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. के. टेलर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. टी. व्ही. जी. सरमा यांनी करून दिला. सायबर संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. आर. ए. शिंदे यांनी मानचिन्ह व महालक्ष्मीच्या मूर्तीद्वारे पाहुण्यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. मधुरा माने यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अनुराधा गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रा. ज्ञानदेव तळूले यांनी विशेष परिश्रम घेतले.
सायबर संस्थेचे सचिव सीए. ऋषिकेश शिंदे, विश्वस्त डॉ. बी. एम. हिलगे, रणजीत पाटील, आर. ए. लटके, व्ही. व्ही. उपाध्ये तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.