मुंबई, दि. ३० :
महाराष्ट्र शासनाचे मावळते मुख्य सचिव राजेशकुमार यांच्याकडून नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारला. राज्य शासनाकडून अग्रवाल यांच्या नियुक्तीचे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले होते.
या प्रसंगी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा वर्मा, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव राधिका रस्तोगी, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद-सिंगल, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, राज्याचे आयटी सचिव वीरेंद्र सिंह तसेच मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी उपस्थित होते. मुख्य सचिव कार्यालयातील अधिकारी आणि मंत्रालयातील विविध विभागांचे कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.
“महाराष्ट्राचा विकास, सुशासन आणि गौरव वाढविण्यासाठी प्रभावीपणे कार्यरत राहीन,” असे पदभार स्वीकृतीनंतर बोलताना राजेश अग्रवाल यांनी सांगितले. राज्य प्रशासनाची कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्नशील राहण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.
राजेश अग्रवाल : एक समृद्ध प्रशासकीय प्रवास
राजेश अग्रवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेत 1989 साली महाराष्ट्र कॅडरमध्ये दाखल झाले. मूळचे पंजाबमधील जालंधर येथील असलेल्या अग्रवाल यांनी कॉम्प्युटर सिस्टिममध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली आहे.
गत तीन दशकांत त्यांनी राज्य व केंद्र शासनातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
त्यांच्या सेवाकाळातील काही प्रमुख जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे:
-
सहायक जिल्हाधिकारी, रत्नागिरी
-
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव
-
जिल्हाधिकारी, अकोला
-
उप विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली
-
केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
-
संचालक, भारत निवडणूक आयुक्त कार्यालय
-
सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई
-
राष्ट्रीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, इंटर्नल एक्स्चेंज ऑफ इंडिया, नवी दिल्ली
-
सचिव, कृषी व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय
-
सचिव, सामाजिक न्याय विभाग (अतिरिक्त कार्यभार)
-
सचिव, वित्त विभाग व लेखा-कोषागारे विभाग
-
सह सचिव, केंद्र सरकार – वित्त सेवा विभाग
-
सह सचिव, केंद्र सरकार – आदिवासी विकास विभाग
-
महासंचालक (प्रशिक्षण), कौशल्य विकास विभाग, केंद्र
-
अतिरिक्त सचिव व वित्त सल्लागार – पेट्रोलियम व नैसर्गिक वायू विभाग
-
सचिव, केंद्र सरकार – कौशल्य विकास विभाग
-
सचिव, केंद्र सरकार – सामाजिक न्याय विभाग
-
अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई



