बालिंगा -मोहन कांबळे :
सामाजिक योगदानात अग्रेसर असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य हाती घेतले जातात. जन सामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाते. सोलर एक किलो वॅटद्वारे उपवडे ग्रामस्थांच्या कामाला गती देण्यात हातभार लावल्याचे समाधान लाभल्याचे मत इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या अध्यक्षा रुक्मिणी हेगिष्टे यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर येथील हॉटेल थ्री लिव्ह्ज येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी इनरव्हील 317 च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षा पाटील या होत्या.
यावेळी क्लबच्या वतीने उपवडे ग्रामपंचायतीस ५० हजाराचा चेक सरपंच पांडुरंग पोवार, ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी वाडकर यांच्याकडे प्रदान करण्यात आला. या प्रकल्पाचा फायदा उपवडे नजीक असलेल्या वाडयावस्त्यांना होणार आहे. विजपुरवठा अभावी ग्रामपंचायतीच्या कामकाजातील अडथळा दूर होणार आहे. हा पर्यावरण पूरक प्रकल्प कार्यान्वित करण्यामध्ये क्लबच्या अध्यक्षा रुक्मिणी हेगिष्टे, सचिव स्मिता घोसाळकर, संपादिका चारुता शिंदे, यांनी पुढाकार घेतला. माजी अध्यक्षा माणिक पाटील, बिना मोहिते, रंजनी जाधव,,मनीषा संकपाळ, सुनंदा चिपळूणकर, राजश्री पाटील, स्मिता डुनुंग, सुवर्णा पाटील किणीकर ,सुवर्णा वाडीकर,यांनी आर्थिक सहकार्य केले.
इनरव्हील 317 च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षा पाटील म्हणाल्या उपवडे ग्रामपंचायत म्हणजे करवीर तालुक्यातील शेवटचं गाव. ग्रामस्थांची कागदपत्रासाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन उपवडे ग्रामपंचायतीच्या कामकाजाला चालना मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरने उचललेलं पाऊल सर्वांना दिशा देणारे आहे, असे गौरवोदगार काढले.
या कार्यक्रमास इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.