मुदाळतिट्टा/प्रतिनिधी:
मुरगूड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज किरकोळ बाचाबाचीचे प्रसंग वगळता शांततेत ८८.४३ टक्के चुरशीने मतदान झाले.एकूण १० हजार १२८ मतदारांपैकी
८९५६ मतदारांनी मतदान नोंदवले.यामध्ये ४३५९पुरुषांनी तर ४५९७ स्त्रीयांनी मतदानाचा हक्क बजावला.
सायंकाळी ४ नंतर मतदान केंद्र क्र.९ वर मतदान यंत्राचे बटण दाबत नसल्याची मतदारांची तक्रार होती.त्यामुळे कांही वेळ मतदान प्रक्रिया थांबली होती.
आज सकाळपासून सर्व मतदान केंद्रावर शांततेत आणि सुरळीतपणे मतदान सुरु झाले.सकाळपासूनच मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्यासाठी दोन्ही गटाकडील कार्यकर्ते शर्तीचे प्रयत्न करताना दिसत होते.त्यामुळे सकाळ पासून मतदान केंद्रावर गर्दी दिसत होती. बाहेरगावी,शेताकडे तसेच कामावर जाणाऱ्या मतदारांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ,माजी खासदार संजय मंडलिक, शाहूचे समरजितसिंह घाटगे,अँड.विरेंद्र मंडलिक,शिवसेनेचे विजय देवणे आदी नेते मंडळींनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुहासिनी पाटील व तसीनम जमादार यांनी मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी मतदान प्रक्रिया धिम्या गतीने सुरु झाली.पण अकरा वाजल्यानंतर मतदानास जोर धरला.दुपारी दीड वाजेपर्यंत सुमारे ५२ टक्के मतदान नोंदले.प्रभाग क्रमांक ८ मध्ये सर्वाधिक ९२% तर प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वात कमी ८३% मतदान नोंदवले आहे.
सर्वच मतदान केंद्रावर बऱ्यापैकी ८० टक्के मतदान नोंदले आहे.शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला.