Friday, January 16, 2026
Google search engine
HomeEducationशाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक आणि कृतिशील धोरणांची गरज – डॉ. अंबादास मोहिते

शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक आणि कृतिशील धोरणांची गरज – डॉ. अंबादास मोहिते

कोल्हापूर : येथील सायबर महाविद्यालय संचलित दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “शाश्वत विकास आणि समाजकार्य” या विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मासवे संघटनेचे अध्यक्ष डॉ. अंबादास मोहिते यांनी भारतातील सद्यस्थिती पाहता शाश्वत विकासाची ध्येये गाठणे आव्हानात्मक असल्याचे सांगितले.

आपल्या सखोल विवेचनात त्यांनी पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रांत ठोस, गांभीर्यपूर्ण आणि कृतिशील धोरणे राबविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. “लोकसहभाग वाढविल्याशिवाय शाश्वत विकासाला गती मिळू शकत नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. दीपक भोसले यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी मेघा बामणीकर यांनी चळवळीचे गीत सादर केले. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन मुक्ता देसाई यांनी केले.

दुसऱ्या सत्रात पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्या डॉ. रसिया पडळकर यांनी परदेशातील शाश्वत विकासाची स्थिती आणि अविकसित व विकसनशील देशांतील वास्तव याची सांगड घालत मार्गदर्शन केले. “विकसित देश मोठ्या प्रमाणात साधनसामुग्रीचा वापर करूनही पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रभावी योजना राबवत आहेत. मात्र विकसनशील देशांना संसाधनांच्या मर्यादा आणि आर्थिक अडचणींमुळे मोठी आव्हाने भेडसावत आहेत,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.

समारोप सत्रात सातारा येथील डॉ. पंकज कुमार दास यांनी शाश्वत विकासाच्या ध्येयांची तातडी अधोरेखित करून सांगितले की, “ही ध्येये साध्य न झाल्यास भारतासारख्या देशांना गंभीर सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.” युवकांनी या ध्येयांचे महत्त्व समजून सक्रियतेने काम केल्यास लवकर यश मिळू शकते असा त्यांनी आशावाद व्यक्त केला.

कार्यशाळेच्या शेवटी उपस्थित सहभागींपैकी पुढील काळात शाश्वत विकासाच्या प्रक्रियेत आपण कोणती भूमिका बजावू शकतो यावर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सायबर महाविद्यालयाचे संचालक डॉ. आर. के. टेलर, प्रशासकीय अधिकारी डॉ. विनायक साळोखे, डॉ. टी. व्ही. जी. शर्मा, डॉ. सोनिया राजपूत, डॉ. सुरेश आपटे, डॉ. दुर्गेश वळवी, डॉ. कालिंदी रामभरे, तसेच रोहित रेळेकर, अक्षय फडके, आर्या रेनके, गायत्री वावगे, विशाखा वानखेडे, अस्मिता भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. अंबादास मोहिते यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. छायाचित्रात डॉ. आर. के. टेलर, डॉ. दीपक भोसले, डॉ. एस. व्ही. शिरोळ, डॉ. रसिया पडळकर, डॉ. सोनिया राजपूत, डॉ. पंकज कुमार दास आणि डॉ. टी. व्ही. जी. शर्मा उपस्थित होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News