Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALकेंद्र व राज्य सरकार शेतक-यांच्या प्रश्नावर बेजबाबदार : राजू शेट्टी

केंद्र व राज्य सरकार शेतक-यांच्या प्रश्नावर बेजबाबदार : राजू शेट्टी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :  केंद्र व राज्य सरकार शेतक-यांच्या प्रश्नावर बेजबाबदार झाल्यानेच देशातील शेती व्यवसायाची अधोगती होत चालली आहे. देशातील मुठभर उद्योगपतींच्या हितासाठी ढीगभर शेतक-यांच्या माथी चुकीच्या धोरणांचा वरवंटा फिरवला जात असल्याची टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी शहादा जि. नंदुरबार येथे घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात केली. 

         यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि ,देशाची अर्थव्यवस्था ढासळत चाललेली आहे ही अर्थव्यवस्था टिकवून ठेवायची असेल तर केंद्र सरकारने शेती व्यवसायाकडे दुर्लक्षित करून चालणार नाही. राज्यातील शेतकरी अतिवृष्टी , महापूर, अस्मानी व सुल्तानी संकटे यासारख्या नैसर्गिक आपत्तीने खचला गेला आहे.राज्यामध्ये दररोज ८ हून अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. या अशा काळातही राज्य व केंद्र सरकार शेतक-यांना मदत करण्यास हात आखडता घेत आहे. 

        उद्यापासून नागपूर मध्ये राज्याचे अधिवेशन सुरू होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लोकशाहीचे मंदिर असणा-या विधानभवनात प्रवेश करण्याआधी विधानभवानाच्या पाय-यावर माथा टेकून अंर्तमुख होवून राज्यातील आत्महत्या करणारा शेतकरी डोळ्यांसमोर आणावा म्हणजे राज्यातील शेतक-यांचे वास्तव लक्षात येईल.अदानीच्या हितासाठी जर राज्यामध्ये १ लाख कोटी रूपयाचा शक्तीपीठ महामार्ग केला जात असेल तर दररोज ८ शेतकरी व वर्षाला जवळपास ३ हजार आत्महत्या थांबवण्यासाठी राज्याच्या तिजोरीत ३५ हजार कोटी नाहीत हे कृषीप्रधान देशातील शेतक-यांचे दुर्दैव आहे. 

        नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातील कापूस, ज्वारी, मका, तूर, बाजरी, गहू, हरभरा, ऊस, सोयाबीन, मिरची उत्पादक शेतक-यांचे अर्थकारण कोलमडले आहे. यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शेतकरी नेते राज्य संघटक घनश्याम चौधरी यांनी शिवसेनेला रामराम ठोकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घरवापसी केली. या कार्यक्रमास मराठवाडा प्रमुख किशोर ढगे , राज्य प्रवक्ते अनिल पवार , युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अमर कदम , कोषाध्यक्ष बापू कारंडे , नंदुरबार जिल्हाध्यक्ष नथू पाटील , पवन पटेल यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News