Friday, April 3, 2026
HomeUncategorizedशिये जिल्हा परिषदेत १९ वर्षानंतर काँग्रेसची झेंडा : विश्वनाथ पाटील यांनी पंधरा...

शिये जिल्हा परिषदेत १९ वर्षानंतर काँग्रेसची झेंडा : विश्वनाथ पाटील यांनी पंधरा दिवसात मैदान मारले

शिये / प्रतिनिधी

शिये जिल्हा परिषद मतदार संघात विश्वनाथ उर्फ हामु विलास पाटील यांच्या रूपाने २००७ नंतर तब्बल १९ वर्षानंतर काँग्रेसने २४३१ मताने विजय मिळवत सरशी केली आहे.आमदार सतेज पाटील यांनी ऐनवेळी मैदानात उतरवलेल्या हुकमी एक्क्याने पंधरा दिवसात मैदान मारून काँग्रेसचा झेंडा फडकवला.
२००७ साली झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नामुळे काँग्रेसच्या कल्पना किडगावकर या विजयी झाल्या होत्या.त्यानंतर झालेल्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेचे उमेदवार निवडून आणून शिये जिल्हा परिषद हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले होते.परंतु या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या मायक्रो प्लॅनिंग प्रमाणे सुरुवातीपासूनच शिये जिल्हा परिषदेची उमेदवारी ही शिये गावातच देण्याचे पक्के केले होते.त्यामुळे ऐनवेळी आमदारांचा ए प्लॅन फसल्यामुळे त्यांनी बी प्लॅन मधला विश्वनाथ पाटील यांच्या रूपाने हुकमाचा एक्का बाहेर काढला. आणि आमदार सतेज पाटील यांच्या या निर्णयाला मतदार संघातील इतर गावांनी ही तितक्याच ताकतीने मदत केली. त्यामुळेच गेल्या पंधरा दिवसात सुरू काँग्रेसच्या प्रचाराच्या झंजावातामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडणार हे निश्चित झाले होते.शेवटच्या दोन दिवसात भाजपाच्या उमेदवाराने मुसंडी मारत काँग्रेस व शिवसेने पुढे आव्हान निर्माण केले होते. पण त्यांचे आव्हान हे शिवसेनेच्या उमेदवारालाच अडथळा ठरले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह,शिवसेना( उबाठा ), स्वाभिमानी शेतकरी संघटना, व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाला परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बळ दिले. त्यामुळेच काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांचा विजय सुकर होत गेला. मतमोजणी वेळी प्रत्येक फेरी नंतर पाटील यांचे मताधिक्य वाढतच गेले. आणि अखेर त्यांनी शिवसेनेचे विश्वनाथ पोवार यांचा पराभव करत शिवसेनेचा गड काँग्रेसकडे खेचून आणला.
……………………………
भुयेवाडीकरांनी पुन्हा पंचायत समिती खेचून आणली

भुयेवाडी आणि पंचायत समितीतील विजय हे समीकरण शिये पंचायत समितीत गेल्या काही निवडणुकात निश्चित झाले होते. यापूर्वी झालेल्या पाच निवडणुकात शिवसेनेचे पहिले पंचायत समिती पंचायत समिती सदस्य स्वर्गीय विष्णुपंत लोहार झाले. त्यानंतर कृष्णात पोवार यांना शिवसेनेच्या माध्यमातून दुसऱ्यांदा संधी मिळाली. त्यानंतर दोन वेळा या गावाला पंचायत समिती पदाने हुलकावणी दिली होती. पण नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या सौ. उमा पाटील यांच्या रूपाने तिसऱ्यांदा पंचायत समिती आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले. सौ उमा अमित पाटील या ४४२ मतांनी विजयी झाल्या.
…………………..
गड आला पण सिंह गेला

निगवे दुमाला पंचायत समिती गणात शिवसेनेच्या श्रीमती रुपाली निवास कुर्ले यांनी २७७० इतक्या प्रचंड मतांनी विजयी मिळवला. त्यांचे पती व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर निवास कुर्ले यांचे निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच अल्पशा आजारामुळे आकस्मित निधन झाले. त्यामुळे त्यांची निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली.आणि त्यांना एकतर्फी विजय करत निवास कुर्ले यांना या पंचायत समिती गणाने आदरांजली वाहिली.

……………………………………………………..

शियेकारांची हॅट्रिक

शिये जिल्हा परिषद संघ सलग तिसऱ्यांदा आपल्याकडे ठेवत शियेकरांनी या मतदारसंघात हॅट्रिक साधली आहे.शियेकरांना शिवसेनेकडून बाजीराव पाटील यांच्या रूपाने पहिल्यांदा संधी मिळाली.त्यानंतर शिवसेनेकडून दुसऱ्यांदा सौ. मनीषा सतीश कुरणे विजय झाल्या होत्या.तर या निवडणुकीत विश्वनाथ उर्फ हामु पाटील हे काँग्रेसकडून विजयी झाले.विश्वनाथ पाटील यांना इतर गावातील मतदारांसह शियेकरांनीही भरभरून मताचे दान दिले त्यामुळेच शियेकरांनी हॅट्रिक साधली आहे.
………………………………………..

1) शिये जिल्हा परिषद विजयी उमेदवार – विश्वनाथ उर्फ हामू पाटील
2) शिये पंचायत समिती विजयी उमेदवार – सौ उमा अमित पाटील
3) निगवे दुमाला पंचायत समितीचे विजयी उमेदवार – श्रीमती रुपाली निवास कुर्ले

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular