कोल्हापूर विभागातील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. हुपरी, पेठ वडगाव, गडहिंग्लज, वाठार आणि चंदगड येथील बस स्थानकांच्या नूतनीकरण व काँक्रिटीकरणासाठी तब्बल ११ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दक्षिणचे भाजपचे आमदार अमल महादेवराव महाडिक यांनी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
या निधीतून स्थानकांच्या इमारतींची दुरुस्ती, प्लॅटफॉर्मचे काँक्रिटीकरण, पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी योग्य निचरा व्यवस्था, प्रवाशांसाठी प्रशस्त प्रतीक्षागृहे, स्वच्छतागृहे तसेच प्रकाशयोजनेची सुधारणा केली जाणार आहे. यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
कोल्हापूर विभागातील या महत्त्वाच्या बस स्थानकांचे आधुनिकीकरण झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होईल, तसेच स्थानिक व्यापाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
या निर्णयामुळे एसटी प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.