जोतिबा:
श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे काल घडलेल्या प्रकाराने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. परिते येथील सासनकाठी धारकांकडून मंदिर परिसरात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या घटनेच्या निषेधार्थ आज डोंगरावर कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिते गावातील सुमारे 100 ते 200 जणांचा समूह दर्शनासाठी जोतिबा डोंगरावर आला होता. मात्र, त्यातील काही जणांनी मद्यपान केल्याचा आरोप पुजाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
या भाविकांनी मंदिर परिसरात प्रवेश करून आरती सुरू असताना गोंधळ घालत धक्काबुक्की केल्याचे सांगितले जात आहे. तसेच, काही जणांनी वयोवृद्ध व्यक्तींशी गैरवर्तन केल्याचा आणि महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे.
विशेष म्हणजे, आरतीवेळी ढोल वाजवणाऱ्या एका वृद्ध पुजाऱ्याशी गैरवर्तन करत त्यांचे धोतर फेडल्याची गंभीर घटना घडल्याचे समोर आले आहे. याशिवाय, देवस्थान इनचार्ज यांच्यावरही हात उचलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या घटनेदरम्यान मंदिर प्रशासन आणि संबंधित भाविकांमध्ये वाद निर्माण झाला होता. मात्र, या वादाचा संपूर्ण तपशील काही माध्यमांतून समोर न आल्याने चुकीचा संदेश पसरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी संबंधित भाविकांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मंदिर परिसरात गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.
या घटनेमुळे पुजारी समाजाची बदनामी होत असल्याची नाराजी व्यक्त होत असून, सत्य परिस्थिती समोर आणण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.