कोल्हापूर, दि. २५ मार्च — जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही समाजमाध्यमांवर पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यामुळे अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागून मागणी व पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक हित लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे (भा.प्र.से.) यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत विशेष आदेश जारी केले आहेत. हे आदेश तात्काळ लागू करण्यात आले असून 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहणार आहेत.
नवीन आदेशानुसार दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंतच इंधन देण्यात येणार आहे, तर तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी ही मर्यादा 2000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून केवळ आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राधान्याने इंधन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, सर्व पेट्रोल पंप चालकांना दररोज उपलब्ध साठा, प्राप्त साठा आणि मागणी याची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनालाही पेट्रोल पंपांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.