नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास अधिक गतीने सुरू असून रविवारी (29 मार्च) नाशिक जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आरोपी अशोक खरात याची पोलीस कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. सरकारी पक्षाने मांडलेल्या युक्तिवादानंतर ही मुदतवाढ देण्यात आली.
तपासाचा भाग म्हणून एसआयटी पथकाने सलग तिसऱ्या दिवशी खरातच्या नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयाची झडती घेत पंचनामा केला. याच ठिकाणी अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाने मोठे स्वरूप घेतले आहे.
झडतीदरम्यान तपास अधिकाऱ्यांना एक धक्कादायक बाब आढळून आली. खरातच्या केबिनमध्ये अत्यंत उच्च दर्जाच्या गडद काळ्या काचा बसविण्यात आल्या होत्या. बाहेरून आत काहीही दिसू नये, यासाठी खास व्यवस्था करण्यात आल्याचे समोर आले आहे. या काचांमुळे केबिनमध्ये काय सुरू असायचे, याचा बाहेरील व्यक्तींना कोणताही अंदाज येत नव्हता.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, आतापर्यंत अशोक खरातविरोधात एकूण दहा गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी आठ गुन्हे लैंगिक अत्याचाराशी संबंधित असून दोन गुन्हे फसवणुकीचे आहेत. आणखी काही पीडित महिलांनी पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी हा प्रकरणातील मास्टरमाइंड असून तो तपासात सहकार्य करत नाही. त्यामुळे सखोल चौकशीसाठी अधिक वेळ आवश्यक आहे. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय दिला.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.