कोल्हापूर : आत्महत्या प्रतिबंध आणि ‘आशा’ या महत्त्वपूर्ण विषयावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने सायबर महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, ३० मार्च २०२६ रोजी होणारे हे चर्चासत्र सायबर महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
या चर्चासत्राचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश दिपाली डोईफोडे यांच्या हस्ते होणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
हैदराबाद येथील फराह सिद्दिकी, गोवा येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर, मिरज येथील डॉ. सनद पवार, तसेच यशवंतराव चव्हाण सेंटरचे दिपाली शेरखाने आणि संतोष मेखले हे मान्यवर आत्महत्या प्रतिबंध, मानसिक आरोग्य आणि सकारात्मक दृष्टीकोन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वयक डॉ. दीपक भोसले, संतोष मेखले आणि दिपाली शेरखाने यांनी केले आहे.
मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी आणि आत्महत्येच्या वाढत्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे ठरत असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.