Friday, April 3, 2026
HomeEducationआत्महत्या प्रतिबंधासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्नांची गरज – न्यायाधीश दिपाली डोईफोडे

आत्महत्या प्रतिबंधासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्नांची गरज – न्यायाधीश दिपाली डोईफोडे

कोल्हापूर : सायबर महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “आत्महत्या प्रतिबंध आणि आशा” या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश दिपाली डोईफोडे यांनी आत्महत्या रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

त्या म्हणाल्या की, आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर उपाय नसून तो अविचारी निर्णय आहे. यामुळे संबंधित व्यक्तीच्या कुटुंबावर अधिक संकटे ओढवतात. सध्याच्या काळात सर्व वयोगटांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून याचा सामाजिक संतुलनावरही विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे या समस्येवर समाजाच्या सर्व स्तरांवर ठोस उपाययोजना राबवणे अत्यावश्यक आहे.

कार्यशाळेची सुरुवात समन्वयक डॉ. दीपक भोसले यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी जिल्हा, राज्य आणि देशपातळीवरील आत्महत्यांच्या वाढत्या आकडेवारीचा आढावा घेतला आणि या कार्यशाळेतून कृतिशील उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्रातील आत्महत्या प्रतिबंधात्मक हेल्पलाइन क्रमांकांच्या माहितीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

या प्रसंगी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या दिपाली शेरखाने, डॉ. सोनिया रजपूत, डॉ. टी. व्ही. जी. शर्मा, मनीषा जाधव आदींनी आपले विचार मांडले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन मुक्ता देसाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुरेश आपटे यांनी केले.

दिवसभरात विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. मिरज येथील मनोविकार तज्ज्ञ डॉ. सनद पवार यांनी आत्महत्येची कारणमीमांसा स्पष्ट केली. हैदराबाद येथील सामाजिक कार्यकर्त्या फराह सिद्दीकी यांनी सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व सांगितले, तर गोवा येथील ‘अन्याय रहित जिंदगी’ संस्थेचे डॉ. रुपेश पाटकर यांनी आत्महत्या प्रतिबंधात्मक उपायांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

समारोप सत्रात सहभागी सदस्यांनी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपायांवर सामूहिक सादरीकरण केले. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहभागी सदस्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या कार्यशाळेसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, सचिव हेमंत टकले, सायबरचे अध्यक्ष डॉ. आर. ए. शिंदे, सचिव सीए ऋषिकेश शिंदे, मनीषा जाधव आदींचे सहकार्य लाभले. कार्यशाळेत विविध भागांतील सुमारे १०० हून अधिक सदस्य सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular