Friday, April 3, 2026
HomePoliticalकोल्हापूर : जोतिबा मंदिरातील वाद चिघळला; परिते ग्रामस्थांचा भव्य मोर्चा, ‘पुजारी हटवा’ची...

कोल्हापूर : जोतिबा मंदिरातील वाद चिघळला; परिते ग्रामस्थांचा भव्य मोर्चा, ‘पुजारी हटवा’ची मागणी जोरात

कोल्हापूर : 

 जिल्ह्यातील जोतिबा मंदिर येथे पुजारी आणि भाविकांमध्ये झालेला वाद आता गंभीर स्वरूप धारण करत आहे. पुजाऱ्यांकडून भाविकांवर अमानुष मारहाण झाल्याच्या आरोपांमुळे पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली असून यात्रेच्या तोंडावर प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर परिते गावच्या ग्रामस्थांनी सोमवारी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढत तीव्र नाराजी व्यक्त केली. हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ, महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. “पुजारी हटवा… पगारी पुजारी नेमा…” आणि “भाविकांवर अन्याय बंद करा…” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

वादाचे कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, परिते गावातील काही भाविक धार्मिक कारणासाठी मंदिरात गेले असता त्यांचा काही पुजाऱ्यांशी वाद झाला. हा वाद चिघळत जाऊन पुजाऱ्यांनी भाविकांना मारहाण केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर एका भाविकाच्या डोक्यात नारळ मारल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, पुजाऱ्यांकडून ग्रामस्थांवर दारूच्या नशेत गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला. मात्र ग्रामस्थांनी हे आरोप फेटाळून लावत, “आम्ही केवळ धार्मिक कारणासाठी गेलो होतो, कोणताही गोंधळ घातलेला नाही,” असा दावा केला आहे. उलट पुजाऱ्यांकडूनच गैरवर्तन झाल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रशासनाकडे कारवाईची मागणी

मोर्चानंतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित पुजाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मंदिरातील मनमानी थांबवून पगारी पुजारी नेमण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे.

यात्रेपूर्वी तणाव वाढला

जोतिबा मंदिर हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः चैत्र महिन्यातील यात्रा अत्यंत प्रसिद्ध आहे. यंदा १ एप्रिल रोजी होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा वाद उफाळल्याने परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे.

यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली असताना ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा आणि पुजाऱ्यांवरचे गंभीर आरोप यामुळे प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता प्रशासन या प्रकरणावर काय तोडगा काढते आणि यात्रेपूर्वी परिस्थिती नियंत्रणात आणते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular