नाशिक – भोंदू म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, विशेष तपास पथक (SIT) तपासाचा आज १३वा दिवस आहे. तपासादरम्यान दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत असून, प्रकरणाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे.
SIT कडून खरात यांच्या कार्यालयावर आणि संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, त्यातून अनेक संशयास्पद वस्तू आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच, पोलिसांनी त्यांचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतला असून, त्यातील डिजिटल डेटा तपासण्यात येत आहे.
मोबाईल तपासणीदरम्यान मोठा खुलासा झाला आहे. खरातने आपल्या मोबाईलमध्ये तब्बल अडीच हजारांहून अधिक संपर्क क्रमांक कोडवर्डमध्ये सेव्ह केले असल्याचे उघड झाले आहे. या कोडवर्डमध्ये अनेक राजकीय नेत्यांची नावे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, सुमारे ४० ते ४५ राजकीय नेते नियमितपणे खरातच्या संपर्कात होते, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, काही राजकीय नेते कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तसेच निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शुभ वेळ आणि तारीख जाणून घेण्यासाठी खरातचा सल्ला घेत असत. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे राजकीय परिणामही मोठे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची नावे छापण्यात आल्याचेही समोर आले असून, ती पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरातच्या अटकेवेळी जप्त करण्यात आलेल्या डिजिटल उपकरणांमधील आर्थिक व्यवहार, संपर्क जाळे आणि इतर संवेदनशील माहितीची तपासणी सुरू आहे. तसेच, त्याच्या संपर्कात आलेल्या संशयितांची चौकशी आणि पीडित महिलांचे जबाब नोंदवण्याचे कामही वेगाने सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणातील सतत होणाऱ्या खुलाशांमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.