Tuesday, May 12, 2026
HomeSocialदुर्गवेदच्या नामकरण सोहळ्यातून सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश

दुर्गवेदच्या नामकरण सोहळ्यातून सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश

हातकणंगले तालुक्यातील मौजे यळगुड येथे दुर्गप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपत एक अनोखा नामकरण सोहळा उत्साहात पार पडला. श्री. ओंकार वैशाली अनिल कुर्ले यांचा भाचा तसेच दुर्गभक्त श्री. सचिन पाटील व सौ. प्रियांका पाटील यांच्या सुपुत्राच्या नामकरण सोहळ्याची सुरुवात ग्रामदैवत दर्शन, गोमातेचे पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजनाने करण्यात आली.

गडकिल्ल्यांविषयी असलेले प्रेम, आत्मीयता आणि इतिहासाची जपणूक या भावनेतून बालकाचे नाव “दुर्गवेद” असे ठेवण्यात आले. हा ऐतिहासिक नामकरण सोहळा श्री. मोहिते मंगल कार्यालय, यळगुड (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे पारंपारिक पद्धतीने आणि शाही थाटात संपन्न झाला.

या सोहळ्याचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये दुर्गवेदचे मामाश्री तसेच आई-वडिलांनी पुढाकार घेत अनेक उपक्रम पार पाडले.

यामध्ये यळगुड हायस्कूलमधील आठवी व नववीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे गड-किल्ल्यांची माहिती आणि छायाचित्रे असलेल्या वह्यांचे वितरण करून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तसेच गावातील धाराऊ गोशाळेला ओला चारा पुरविण्यात आला आणि गोशाळेच्या परिसरात विविध फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमस्थळी छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, मावळे, समर्थ रामदास स्वामी आणि संत तुकाराम महाराज यांच्या छायाचित्रांद्वारे इतिहास जिवंत करण्यात आला होता. संपूर्ण सजावटीत केळीच्या झाडांचा वापर करून पारंपारिकतेला प्राधान्य देण्यात आले.

नामकरण सोहळ्यानंतर उपस्थितांना संदेशपत्रिका देण्यात आल्या. “झाडे लावा, चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा” असा संदेश देत प्रत्येकाला काजू, सीताफळ, चिकू, करंज, पेरू, चिंच आदी विविध वृक्षांच्या बियांचे वाटप करण्यात आले. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांवरही “पाणी वाचवा, निसर्ग वाचवा, गड-किल्ल्यांचे रक्षण करा” असे संदेश देण्यात आले होते.

सोहळ्यात पारंपारिक पद्धतीने केळीच्या पानावर दहा प्रकारच्या पदार्थांचे भोजन ठेवण्यात आले होते. यामध्ये दही-धपाटा, शेंगदाणा चटणी, मटकी-मुगाची उसळ, चपाती, वरण-भात, घुगऱ्या, मसाले ताक, जीरा भात, गाजराचा हलवा आदी पदार्थांचा समावेश होता.

याशिवाय कार्यक्रमास उपस्थित लहान मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अशा प्रकारे इतिहास, पर्यावरण संवर्धन, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवत दुर्गवेदचा नामकरण सोहळा एक आदर्श सामाजिक उपक्रम ठरला.

उपक्रमांची ठळक वैशिष्ट्ये :
१) वृक्षारोपण
२) गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
३) कार्यक्रमस्थळी शालेय साहित्य वितरण
४) गोशाळेला ओला चारा
५) संदेश पत्रिका वाटप
६) पारंपारिक पद्धतीचे भोजन

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular