Wednesday, May 27, 2026
HomeCrimeकोलोली महिला खून प्रकरणी आरोपी गजाआड; पन्हाळा पोलिसांची संयुक्त कारवाई

कोलोली महिला खून प्रकरणी आरोपी गजाआड; पन्हाळा पोलिसांची संयुक्त कारवाई

पन्हाळा प्रतिनिधी : शहाबाज मुजावर

पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे शेतात कामासाठी गेलेल्या महिलेच्या निर्घृण खूनप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पन्हाळा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त तपासाला यश आले आहे.

कोलोली येथील रहिवासी छबुताई सर्जेराव पाटील यांचा रविवारी शेतात धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. या घटनेनंतर पन्हाळा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गावातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, तसेच नातेवाईक, शेजारी आणि गावकऱ्यांची चौकशी यावरून काही संशयित पोलिसांच्या रडारवर आले होते.

तपासादरम्यान अंकुश हणमंत पाटील (वय ५०, रा. कोलोली) हा संशयाच्या भोवऱ्यात आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो पांढरा शर्ट घालून घटनास्थळाच्या दिशेने जाताना आणि परतताना वेगळ्या अवस्थेत दिसल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर पोलिसांनी त्याला दोन वेळा चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सतत देखरेख ठेवत व गोपनीय माहितीच्या आधारे चौकशी तीव्र करण्यात आली.

अखेर आरोपीने खून केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली असून, बुधवारी (दि. २७ मे) दुपारी ३.३९ वाजता त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. काही चर्चांनुसार वैयक्तिक कारणातून हा प्रकार घडल्याची चर्चा परिसरात सुरू असली, तरी पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

आज आरोपीला पन्हाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवार, दि. १ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील, प्रवीण बोरचाटे, दिगंबर चिले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सलीम सनदी, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular