Monday, June 8, 2026
HomeCrimeस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची अवैध गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई; 4.03 लाखांचा मुद्देमाल...

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची अवैध गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई; 4.03 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर, प्रतिनिधी : जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई करत एका आरोपीकडून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला आणि कारसह एकूण 4 लाख 3 हजार 613 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा प्रमुखांना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी आपल्या पथकाला माहिती संकलन करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, पोलीस अंमलदार प्रदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दि. 7 जून 2026 रोजी रात्रीच्या सुमारास एक इसम वॅगनर कारमधून पंचगंगा नदी पुलाकडून इचलकरंजी शहरात अवैध गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने इचलकरंजी शहरातील मरगुबाई मंदिर ते पंचगंगा नदी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, चाणक्य अंत्यसंस्कार केंद्रासमोर सापळा रचला. संशयित वॅगनर कार ताब्यात घेऊन तपासणी केली असता आरोपी धोंडीराम बाळकृष्ण निर्मळे (वय 50, रा. धनगर माळ, कोरोची, ता. हातकणंगले) याच्याकडून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित करण्यात आलेला गुटखा, सुगंधी तंबाखू व पान मसाला असा 1 लाख 93 हजार 613 रुपयांचा माल आढळून आला. तसेच वॅगनर कारसह एकूण 4 लाख 3 हजार 613 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी इचलकरंजी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने  पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular