कोल्हापूर, दि. ९ जून : करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने हळदी गावात छापा टाकून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पान मसाला विक्री करणाऱ्या एका इसमाला पकडले असून त्याच्याकडून ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या होत्या. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश दिले होते.
गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना हळदी गावच्या मुख्य चौकातील भद्रकाली पान शॉपच्या मागील पार्टिशनच्या खोलीत एक इसम प्लास्टिकच्या पोत्यातून लहान पुड्यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत खंडेराव मनोहर नाईक (वय ४५, रा. श्री स्वामी समर्थ गल्ली, हळदी, ता. करवीर) याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडील दोन प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पान मसाला आढळून आला. पंचांसमक्ष एकूण ४७,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीसह जप्त माल पुढील कारवाईसाठी करवीर पोलीस ठाण्यात आणण्यात आला.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात हजर केले असता त्याला ११ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास पोवार करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल सो, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे शोध पथकाने केली.