कोल्हापूर, दि. ९ जून : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात मंगळवारी कोल्हापुरात शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. “एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द” अशा जोरदार घोषणांनी कोल्हापूर शहर दणाणून गेले. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.

मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत “रक्ताचे पाट वाहतील, पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही” असा इशारा दिला. कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत महामार्गाविरोधातील एकजूट दाखवून दिली.


