Tuesday, September 1, 2026
HomePoliticalकोल्हापूर महानगरपालिकेतील रिक्त पदे त्वरित भरा; आम. सतेज पाटील यांची एकनाथ शिंदे...

कोल्हापूर महानगरपालिकेतील रिक्त पदे त्वरित भरा; आम. सतेज पाटील यांची एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेतील तांत्रिक संवर्गातील रिक्त पदांमुळे शहराचा विकास आणि दैनंदिन नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता महानगरपालिकेतील अत्यावश्यक व तांत्रिक सेवेतील पदे भरण्यासाठी ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल करावी, अशी मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

​आमदार सतेज पाटील यांनी निवेदनात म्हंटले आहे की, शासनाने १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुधारित आकृतिबंधातील वर्ग १ ते ४ मधील एकूण ४,४४५ पदांच्या आकृतिबंधास मान्यता दिली आहे. मात्र, सन २०१७ पासून महानगरपालिकेतील तांत्रिक पदे कायमस्वरूपी भरण्यात आलेली नाहीत.

 

सेवानिवृत्तीमुळे सध्या तांत्रिक संवर्गातील तब्बल ८० टक्के पदे रिक्त आहेत. सध्या तांत्रिक संवर्गात केवळ २३ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यावर बांधकाम परवाने, लेआऊट मंजुरी, अतिक्रमण कारवाई, गुंठेवारी नियमितीकरण आणि रस्ते दुरुस्ती यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामांचा अतिरिक्त भार पडत आहे. परिणामी, नागरिकांची मोठी गैरसोय होत असून महापालिका प्रशासनाला मूलभूत सेवा-सुविधा पुरवण्यात मर्यादा येत आहेत.

​महापालिका प्रशासनाने गट ‘अ’ ते गट ‘डी’ मधील अत्यावश्यक पदे भरण्यासाठी ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव ११ मार्च २०२६ रोजी नगरविकास विभागाच्या (नवि-२) अपर मुख्य सचिवांकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, जेणेकरून रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा होईल आणि शहरातील विकासकामांना गती मिळेल, असे आमदार सतेज पाटील यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular