Thursday, September 3, 2026
HomeEducationतोडकर हायस्कूल मध्ये नीलम दिवसे यांचा सत्कार,पवित्र पोर्टल मधून जि प कोल्हापूर...

तोडकर हायस्कूल मध्ये नीलम दिवसे यांचा सत्कार,पवित्र पोर्टल मधून जि प कोल्हापूर येथे पदवीधर शिक्षिका म्हणून नियुक्ती

सांगरूळ / प्रतिनिधी
वाकरे (ता. करवीर) येथील पै. शंकर तोडकर हायस्कूलमधील संस्था नियुक्त अध्यापिका नीलम दीपक दिवसे यांची महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा परिषदेत पदवीधर शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या या यशाबद्दल पै. शंकर तोडकर हायस्कूलच्या वतीने मुख्याध्यापक डॉ. बी. बी. पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक डॉ. बी. बी. पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांचे यश हेच शिक्षकासाठी सर्वांत मोठे समाधान असते. नीलम दिवसे यांच्याकडे शैक्षणिक गुणवत्ता आणि उपक्रमशीलता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतही त्या विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न घडवतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना नीलम दिवसे म्हणाल्या, “विद्यार्थी हीच शिक्षकाची खरी संपत्ती आहे. पै. शंकर तोडकर हायस्कूलमध्ये अडीच – तीन महिन्यांच्या कालावधीत मिळालेला शैक्षणिक अनुभव माझ्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीस निश्चितच उपयुक्त ठरेल.”
सहाय्यक शिक्षक जी. डी. लव्हटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दर्जेदार व प्रामाणिकपणे केलेल्या कामाची योग्य पोहोचपावती मिळते, हे नीलम दिवसे यांच्या यशातून दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डी. एस. मोरे व ममता शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनी वेदिका माने, वैष्णवी पाटील, श्रावणी सावंत व निशा कांबळे यांनी नीलम दिवसे यांनी अध्यापनाबरोबरच शालेय शिस्त तसेच दैनंदिन जीवनातील शिस्तीचे धडे दिल्याचे सांगितले.
यानंतर शाळेच्या वतीने तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या वतीने नीलम दिवसे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी एस. ए. बिरंजे, डी. एच. शिंदे, पी. ए. बिरंजे यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular