Tuesday, September 8, 2026
HomeEconomyबहिरेश्वरमध्ये डॉल्बीचा दणका; आठ डॉल्बी सिस्टीमसह आठ ट्रॅक्टर जप्त

बहिरेश्वरमध्ये डॉल्बीचा दणका; आठ डॉल्बी सिस्टीमसह आठ ट्रॅक्टर जप्त

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी यात्रेदरम्यान पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करून डॉल्बीचा वापर करणाऱ्या आठ मंडळांवर करवीर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत आठ डॉल्बी सिस्टीम, डॉल्बी वाहून नेणारे सहा टेंपो/वाहने आणि डॉल्बी लावण्यासाठी मॉडिफाय केलेले आठ ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. संबंधित मंडळांचे अध्यक्ष, डॉल्बी मालक तसेच ट्रॅक्टर मालकांविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बहिरेश्वर येथे प्राचीन श्रीकृष्ण मंदिर असून दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात यात्रा भरते. यात्रेदरम्यान गावातील विविध तरुण मंडळांकडून डीजे व डॉल्बीचा वापर केला जातो. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बहिरेश्वरच्या यात्रेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. गणेशोत्सवात डॉल्बीला परवानगी मिळणार का, याबाबतही चर्चा सुरू होती.

यात्रेसाठी क्रॅक मेंबर्स, एस.पी. बॉईज, फेमस ग्रुप, रॉयल क्लब, फार्म हाऊस ग्रुप, एम.पी. बॉईज, युवा सर्कल ग्रुप आणि पठार किंग ग्रुप या मंडळांनी करवीर पोलिसांकडे डॉल्बी लावण्याची परवानगी मागितली होती. त्यांना स्पीकर परवाना देण्यात आला होता. मात्र, ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) अधिनियम २००० मधील तरतुदींचे उल्लंघन करू नये, डॉल्बी समोरासमोर लावून आवाजाची चुरस अथवा हुल्लडबाजी करू नये, तसेच ट्रॅक्टरच्या बोनेटवर फळी अथवा स्ट्रक्चर उभारून त्यावर कार्यकर्त्यांनी नृत्य करू नये, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या होत्या.

याबाबत सर्व मंडळांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून संबंधित मंडळांनी यात्रेदरम्यान डॉल्बीचा वापर केला. तसेच काही कार्यकर्ते ट्रॅक्टरच्या बोनेटवर फळी टाकून उभारलेल्या स्ट्रक्चरवर नृत्य करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

यानंतर पोलिसांनी कारवाई करत आठ डॉल्बी सिस्टीम, आठ मॉडिफाय केलेले ट्रॅक्टर आणि सहा टेंपो/वाहने पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतली. संबंधित मंडळांचे अध्यक्ष, डॉल्बी मालक आणि ट्रॅक्टर मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

आगामी गणेशोत्सव शांततामय, उत्साहपूर्ण आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने तरुण मंडळांना डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचा भंग करणाऱ्या मंडळांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे, पोलिस उपनिरीक्षक शंकर कळकुटे, सुहास पोवार यांच्यासह पोलिस अंमलदारांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular