मुंबई, दि. ३० : राज्यातील समाजकार्य महाविद्यालयांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) संघटनेच्या वतीने सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ पासून ‘आत्मक्लेश आंदोलन’ सुरू करण्यात येणार आहे. नागपूर येथील सहसंचालक, उच्च शिक्षण यांच्या कार्यालयासमोर तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ३ सप्टेंबर २०२४ रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे समाजकार्य महाविद्यालयांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक झाली होती. या बैठकीस तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच वित्त, उच्च व तंत्र शिक्षण आणि सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत समाजकार्य महाविद्यालयांचे प्रश्न एका महिन्यात निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आल्याचे ‘मास्वे’ने म्हटले आहे.
मात्र, बैठकीला दोन वर्षांचा कालावधी उलटूनही समाजकार्य महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या कालावधीत उच्च शिक्षण विभागाकडे अनेक वेळा पत्रे, स्मरणपत्रे तसेच आवश्यक माहिती व कागदपत्रे साद करण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी आणि उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्यासोबतही बैठका झाल्या. मात्र, ठोस निर्णय न होता केवळ आश्वासने मिळाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध कायम ठेवून रिक्त पदे भरणे, सर्व कर्मचाऱ्यांचे एचटीई सेवा प्रणालीद्वारे ऑनलाइन वेतन करणे, डीसीपीएस/एनपीएस खात्यात शासनाच्या हिश्शाची रक्कम जमा करणे, १४ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या कॅससंदर्भातील शासन निर्णयात सुधारणा करणे, जीपीएफसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध करून देणे, प्राचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे करणे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन व उपदानाचे प्रस्ताव मंजूर करणे, या मागण्या संघटनेने केल्या आहेत.
याशिवाय अतिप्रदान झालेल्या रकमेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे, थकीत इमारत भाडे व वेतनेतर अनुदान देणे, शासनाच्या विविध विभागांतील समाजकार्याशी संबंधित पदांसाठी समाजकार्य पदवी ही शैक्षणिक अर्हता कायम ठेवणे आणि राज्यातील इतर महाविद्यालयांमध्ये नवीन समाजकार्य विभाग सुरू करण्यासंदर्भातील शासन निर्णयाला स्थगिती देणे, या मागण्यांचाही समावेश आहे.
५ ऑक्टोबरपासून आंदोलन
उच्च शिक्षण विभागाकडून होत असलेल्या विलंबामुळे ‘मास्वे’ने १९ सप्टेंबर २०२६ रोजी अपर मुख्य सचिव व उच्च शिक्षण संचालकांना पत्र देऊन ५ ऑक्टोबरपासून नागपूर येथे ‘आत्मक्लेश आंदोलन’ करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनात राज्यातील समाजकार्य महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. तसेच आजी-माजी विद्यार्थी आणि विविध संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा राहणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अंबादास ये. मोहिते आणि महासचिव डॉ. संजय फुलकर यांनी सांगितले.
शासनाने प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन समाजकार्य महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ‘मास्वे’ने केली आहे.