कोल्हापूर, दि. 1 : पावसाने ओढ दिल्याने करवीर तालुक्यातील भात, नाचणी, उडीद, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे करवीर तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करावा, तसेच नुकसानीची स्थळपाहणी करून फेरपंचनामे करावेत, अशी मागणी करवीर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.
याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी कोल्हापूर तसेच करवीर तहसीलदार यांना निवेदन दिले. करवीर तालुका विस्तीर्ण असून सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे शेतातील पिके करपून गेली आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी मोठा खर्च केला असून, महागडी खते, मशागत, मजुरांची कमतरता आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहे. अशा परिस्थितीत पिके हातातून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
शेतकऱ्यांनी संपूर्ण बी-बियाणे शेतात पेरले; मात्र पाऊस न झाल्याने त्यातून अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे तातडीने प्रत्यक्ष शेतांची पाहणी करून फेरपंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी मदतीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
सध्या दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये इतर तालुक्यांचा समावेश आहे; मात्र करवीर तालुक्याचे नाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. करवीर तालुका भौगोलिकदृष्ट्या डोंगरी भागाचा समावेश असलेला तालुका असून, सद्यस्थितीत निर्माण झालेली पाणीटंचाई व पिकांची अवस्था लक्षात घेता त्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करणे आवश्यक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ तसेच करवीरच्या तहसीलदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवून आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
करवीरचा दुष्काळग्रस्त यादीत तातडीने समावेश न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या करवीर विधानसभा शाखेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. वाढती महागाई आणि शेतीचा वाढलेला खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात असून, शासनाने तातडीने निर्णय घेऊन मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, करवीर विधानसभा अध्यक्ष संभाजी पाटील, उपाध्यक्ष कृष्णात पाटील, अजय सुतार, सुरज बागडे, अमर पारर्मीत, ओंकार कांबळे, धोंडेवाडीचे माजी सरपंच पांडुरंग नलवडे, सादळे-मादळेचे उपसरपंच जालिंदर पोवार, सागर सुतार, अशोक घाडगे, प्रकाश जगताप, नारायण कांबळे, प्रकाश लवटे, शामराव वाघमोडे, राजू कांबळे, दिलीप सावंत, मोहन गडकरी, बाबासो वाघमोडे, रवींद्र पाटील, विष्णू पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.