बालिंगा- मोहन कांबळे।
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या (अंबाबाईच्या) क्षेत्रापासून काही अंतरावरच वसलेले ऐतिहासिक व पौराणिक मंदिर म्हणजे बालिंगा गावचे ग्रामदैवत श्री कात्यायनी देवी. नवदुर्गांपैकी सहावी देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवीची आख्यायिका आणि धार्मिक महत्त्व अत्यंत अगाध आहे.
पौराणिक संदर्भ आणि ग्रंथांमधील उल्लेख
‘श्रीदेवी माहात्म्य सप्तशती’च्या ८ व्या, ९ व्या आणि १० व्या अध्यायात श्री कात्यायनीदेवीचे स्पष्ट वर्णन आढळते. तसेच ११ व्या अध्यायात अग्नि आणि इंद्रा देवांनी तिची स्तुती केल्याचा उल्लेख आहे. पद्मपुराणातील करवीरखंडात व्यासमुनींनी रचलेल्या ‘करवीर माहात्म्या’च्या ४६ व्या अध्यायातही या मंदिराचे आणि देवीचे महत्त्व विशद करण्यात आले आहे.
रक्तबीजाचा वध आणि भैरवाची सुटका
पौराणिक कथेनुसार, करवीर क्षेत्राच्या रक्षणासाठी अयोध्येच्या चारही दिशांना चार दूत ठेवले होते. यातील दक्षिण द्वाराचे रक्षण ‘रक्तबीज’ नावाचा असुर करत होता. त्याच्याशी युद्ध करताना भैरवाने अनेक अस्त्रे सोडली, परंतु रक्तबीजाच्या रक्ताच्या थेंबांमधून हजारो असुर निर्माण झाले. संकटसमयी भैरवाने श्री कात्यायनी देवीचा धावा केला.
देवी प्रकट झाली आणि तिने रक्तबीजाचा वध केला. देवीने अमृतकुंडातील जलाचा उपयोग करून मृत देवांना पुन्हा जिवंत केले. या ठिकाणी प्रसन्न झालेल्या भैरवाने देवीची स्तुती केली आणि तीच्यापुढेच राहण्याचे ठरवले.
परशुराम कुंड आणि धार्मिक आख्यायिका
भगवान परशुराम आपल्या पापक्षालनासाठी येथे आले असता त्यांनी अमृतकुंडात स्नान करून देवी व भैरवाची पूजा केली. देवीच्या आज्ञेनुसार त्यांनी येथे स्थापन केलेले ‘परशुरामकुंड’ मंदिराच्या मागे पाहावयास मिळते.
क्षेत्राशी जोडलेल्या काही प्रमुख धार्मिक श्रद्धा:
*परशुराम कुंडाचे* *तीर्थ:* ज्या लहान मुलांना नीट बोलता येत नाही, त्यांनी परशुराम कुंडातील तीर्थ प्राशन केल्यास ते बोलू लागतात, अशी एक आख्यायिका आहे.
*विवाह योग जुळून* *येणे*: ज्यांचे विवाह जुळत नाहीत, अशा उपवर युवक-युवतींनी ५ मंगळवार, ५ शुक्रवार, ५ अमावास्या आणि ५ पौर्णिमा येथे व्रत व साधना केल्यास विवाह योग लवकर येतो, अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे.
मंदिरातील पूजा अर्चा आणि वार्षिक उत्सव
श्री कात्यायनीदेवीची मूळ मूर्ती ही स्वयंभू शिळा स्वरूपात असून शेजारी उत्सवमूर्ती आहे. देवीच्या दर्शनापूर्वी मंदिरातील भैरवाचे दर्शन घेण्याची (‘भैरव अनुज्ञा’) प्रथा आहे. मंगळवार हा देवीचा विशेष वार मानला जातो आणि तिला दररोज दहीभाताचा मुख्य नैवेद्य दाखवला जातो. मंदिरामध्ये अखंड तुपाचा नंदादीप तेवत असतो.
नवरात्रोत्सवात दररोज देवीची विविध रूपांत पूजा बांधली जाते. प्रत्येक पौर्णिमेला येथे तीर्थ प्रसाद, तर अमावास्येला होम-हवन आणि महाप्रसाद आयोजित केला जातो. भक्तांच्या सक्रिय सहकार्यामुळे सध्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात सुधारणा आणि सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.
श्री कात्यायनीदेवी प्रसाद भक्त मंडळ व पुजारी श्री. रामचंद्र गुरव हे येथील व्यवस्थापन पहात असतात. या ठिकाणी शारदीय नवरात्रौत्सव मध्ये ९ दिवस बालिंगे गांवची लोक उपवास व उपासणा करतात या वर्षी १४३ महिला व पुरुष उपवास करीत बसलेले आहेत.उत्कृष्ट फोटोसाठी एआयचा वापर करण्यात आला आहे.